Sada Sarvankar on Raj Thackeray: सदा सरवणकर (Sada Sarvankar) अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम असून, आपण वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच मला विधान परिषदेची ऑफर करण्यात आल्याचं वृत्तही खोटं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
"वर्षावर गेलो हे खरं आहे. पण बैठक झाली हे खोटं आहे. मुंबईत जवळ असल्याने आम्ही दिवसातून तीनदा वर्षावर जातो. तसं आम्ही संध्याकाळी गेल होतो. मुख्यमंत्री विश्रांती करत होते. आम्ही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. एकदा मला मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद दिले आहेत सांगितल्यानंतर रोज लढणार आहे सांगणं योग्य नाही. ज्यांना असं वाटतं की मी मतदारसंघ सोडावा त्यांनी आपले मतदारसंघ मनसेसाठी रिकामे करावेत. प्रत्येक पक्षाचं स्वत:चं एक धोरण असतं. शिवसेनेच्या जागा कोणालाही द्यायच्या नाहीत असं निश्चित झालं आहे," अशी माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, "आम्ही राज ठाकरेंना बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून पाहत आहोत. बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवली नसून शिवसैनिकाला मोठं केलं. राज ठाकरेही माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आहे. म्हणून मी राज ठाकरेंना भेटून विनंती करणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून माझं आणि मतदारसंघाचं आई-मुलासारखं नातं आहे. हे अबाधित ठेवा, तोडू नका. मी वेळ मागितली असून ती मिळेल तेव्हा जाऊन भेट घेईन".