'व्हीआयपींना वाचवतात स्नायफर'; महिला आयपीएस अधिकाऱ्याचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी राहुल गांधींनी केलेलं एक ट्विट वादात सापडलं.

Updated: Jun 22, 2019, 04:56 PM IST
'व्हीआयपींना वाचवतात स्नायफर'; महिला आयपीएस अधिकाऱ्याचं राहुल गांधींना प्रत्युत्तर title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी राहुल गांधींनी केलेलं एक ट्विट वादात सापडलं. या ट्विटमुळे राहुल गांधींवर सोशल मीडियावरुन निशाणा साधण्यात आला. राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाला सेनेच्या 'डॉग युनिट' च्या योग कार्यक्रमाशी जोडणारा फोटो शेअर केला. सरकारवर निशाणा साधत हा 'न्यू इंडिया' असल्याचा टोला लगावला. राहुल यांनी भाजपा आणि सरकारवर निशाणा साधण्याच्या नादात सेना आणि योग दिनाची खिल्ली उडवल्याचे युजर्स म्हणाले.

राहुल गांधी यांच्या ट्विटला महिला आयपीएस अधिकारी डी रुपा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'या श्वानांना हाताळणारे पोलीस किंवा सैनिक असतात. खूप कठीण ट्रेनिंग देऊन त्यांना तयार केलं जातं. ही श्वान त्यांना हाताळणाऱ्या सैनिक किंवा पोलिसांचे आदेशच पाळतात. या दोघांमधलं नातं हे ड्यूटीपेक्षा खूप जास्त आहे. हे श्वान बॉम्बस्फोटाआधी वास घेऊन व्हीआयपी लोकांचा जीव वाचवतात. या न्यू इंडियाचा अभिमान आहे,' असं ट्विट डी रुपा यांनी केलं आहे. डी रुपा या रेल्वेमध्ये पोलीस महानिरीक्षक पदावर आहेत.

राहुल यांनी ट्विटरवर डॉग युनिट च्या योग कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आणि न्यू इंडिया असे लिहिले. या फोटोमध्ये डॉग युनिटमधील श्वान आणि या युनिटशी संबंधित जवान एकत्र योग मुद्रेत दिसत आहेत. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी रांची आणि विविध ठिकाणच्या कार्यक्रमात हिस्सा घेतला. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर लोकांनी त्यांचीच खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.