नवी दिल्ली : IRCTCनं ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वेनं हे बदल प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन केले आहेत. नव्या नियमांनुसार आता प्रवासी १२० दिवस आधी तिकीट बूक करु शकतील. ऑनलाईन बुकिंगमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे एक युजर आयडी वापरून महिन्याला फक्त ६ तिकीटं बूक करता येतील. जर यूजरनं त्याचं आधार कार्ड IRCTCकडे रजिस्टर केलं तर महिन्याला १२ तिकीटं बूक करता येणार आहेत. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत फक्त २ तिकीटं बूक करता येणार आहेत तसंच या कालावधीमध्ये सिंगल पेज किंवा क्विक बुकिंग होणार नाही. यूजर ऑनलाईन आल्यावर त्याला वैयक्तिक माहितीही भरावी लागणार आहे.
बुकिंग एजंटसाठींच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. एजंट आता सकाळी ८ ते ८.३०, सकाळी १० ते १०.३० आणि ११ ते ११.३०मध्येच तिकीटं बूक करु शकतात. म्हणजेच एजंटना आता फक्त अर्धा तासच तिकीटं बूक करता येणार आहेत.
तत्काळ बुकिंग करतानाही एजंटवर लगाम घालण्यात आला आहे. तत्काळ बुकिंग सुरु होईल तेव्हा अर्धा तास पहिले एजंट बुकिंग करु शकणार नाही. तत्काळ बुकिंग प्रवासाच्या एक दिवस आधीच १० वाजता सुरु होईल. जर ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा असेल तर यात्री त्याच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत मागू शकतो. ट्रेनचा मार्ग बदलला तरीही प्रवाशाला तिकीटाचे पैसे मागता येणार आहेत.
युजरला ऑनलाईन तिकीट निश्चित वेळेतच बूक करावं लागणार आहे. प्रवाशाची माहिती भरण्यासाठी युजरला २५ सेकदांचा वेळ मिळणार आहे. तसंच १० सेकंदांमध्ये रक्कम द्यावी लागणार आहे तसंच नेटबॅकिंगमध्ये रक्कम भरताना ओटीपीही भरावा लागणार आहे. तिकीट बुकिंग करताना पारदर्शकता असावी तसंच प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये आणि दलालांपासून रेल्वे मुक्त व्हावी यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचं IRCTCनं सांगितलं आहे.