नवी दिल्ली - आयआरसीटीसी घोटाळ्यामधील आरोपी लालूप्रसाद यादव यांना गुरुवारी पतियाळा हाऊस कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. या प्रकरणाची सुनावणी १९ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्यामध्ये कोर्टाने सुनावलेली शिक्षा भोगत आहेत. मधुमेह आणि इतर आजारांमुळे लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी कोर्टाच्या कामकाजात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि राबडी यादव सुनावणीसाठी कोर्टात आले होते. या प्रकरणी सीबीआयने लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात सीबीआयला आणखी काही कागदपत्रांची आणि पुराव्यांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.
कोर्टाने तेजस्वी यादव, राबडी देवी आणि अन्य आरोपींना ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळीच जामीन मंजूर केला होता. सीबीआयने आरोपींना जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे तपासकामावर परिणाम होईल, असा युक्तिवाद करण्यात आला होता. सक्तवसुली संचालनालयानेही याप्रकरणात जामीन मंजूर करण्याला विरोध दर्शविला होता.