Prithvi Shaw : भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा विविध कारणामुळे चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वीच विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hajare Trophy) घोषित झालेल्या संघातून पृथ्वी शॉला वगळल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वीने सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपलं दुःख व्यक्त केलं होतं. परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉच्या वागणुकीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पृथ्वीने अनेकदा शिस्त भंग केला आहे आणि तो स्वतःच स्वतःचा शत्रू झालाय.
MCA च्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले की, "खराब फिटनेस, शिस्त आणि वाईट वागणूक इत्यादींमुळे संघाला त्याला अनेकवेळा मैदानावर लपविणे भाग पडायचे". विजय हजारे ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या 16 खेळाडूंच्या संघामध्ये पृथ्वी शॉला स्थान देण्यात आले नाही. यापूर्वी झालेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पृथ्वी संघाचा भाग होता मात्र यावेळी त्याच्याकडून मैदानात अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही.
नाव न सांगण्याच्या अटीवरून MCA अधिकाऱ्याने माहिती दिली की, "मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आम्ही 10 फिल्डर्स सोबत खेळत होतो कारण आम्हाला पृथ्वी लपवण्यास भाग पाडले गेले. बॉल त्याच्या जवळून गेला तरी त्याला पकडता आला नाही. एवढेच नाही तर बॅटिंग दरम्यानही आम्ही पाहत होतो कि त्याला बॉलच्या जवळ जाणे देखील अवघड होत होते. त्याची फिटनेस, शिस्त आणि वागणूक खूप खराब आहे. आणि साधी गोष्ट आहे की प्रत्येक खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम असू शकत नाहीत".
हेही वाचा : निवृत्तीची घोषणा केल्यावर R Ashwin ला कोणा-कोणाचे फोन आले? स्टार खेळाडूने शेअर केला Screenshot
MCA अधिकारी पुढे म्हणाला की, "आता वरिष्ठ खेळाडू देखील पृथ्वीच्या या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान पृथ्वी शॉ प्रॅक्टिस सेशन अटेंड करत नव्हता तसेच रात्र रात्रभर हॉटेलबाहेर राहायचा आणि सकाळी 6 वाजता परत यायचा. त्याच्या या बेशिस्तपणामुळे त्याला संघाचा भाग बनवण्यात आलेलं नाही आता त्याने लिहिलेल्या भावुक सोशल मीडिया पोस्टमुळे काहीच फायदा होणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की अशा सोशल मीडिया पोस्टचा मुंबईच्या निवडकर्त्यांवर किंवा असोसिएशनवर काही परिणाम होईल, तर तुम्ही चुकीचे आहात".