IRCTC चं हे चहाचं बिल पाहून, तुम्ही ट्रेनमध्ये कधीही चहा मागवणार नाही

ट्रेनमध्ये चहा मागवणं पडलं महागात, याचं IRCTC चं बिल पाहून तुम्ही चक्रावून जाल

Updated: Jul 1, 2022, 06:37 PM IST
IRCTC चं हे चहाचं बिल पाहून, तुम्ही ट्रेनमध्ये कधीही चहा मागवणार नाही title=

नवी दिल्ली : तुम्ही कधी ट्रेनमध्ये चहा किंवा नाश्ता घेतला असेल तर त्याची किंमत फार कमी येते अगदी चहा 10 किंवा फार तर 20 आणि नाश्ता 30 रुपये असावा. पण सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील चहाच्या बिलाचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यावर ट्रेनमध्ये चहा मागवावा की नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. 

सोशल मीडियावर IRCTC चं एक बिल तुफान चर्चेत आहे. या बिलावर चहाची किंमत 20 रुपये आणि सर्व्हिस चार्ज 50 रुपये असे एकूण 70 रुपये ग्राहकाकडून आकारण्यात आले आहेत. हा सोशल मीडियावर चर्चेचा मोठा विषय बनला आहे. 

बालगोविंद वर्मा नावाच्या एक व्यक्तीने दिल्ली ते भोपाळ दरम्यान धावणाऱ्या भोपाळ शताब्दी ट्रेनमध्ये प्रवास केला. या प्रवासादरम्यान एक कप चहा ऑर्डर केला ज्यामध्ये चहाची किंमत फक्त 20 रुपये होती, पण त्यावर सर्व्हिस टॅक्स 50 रुपये लिहिला होता. म्हणजेच त्यांना एका कप चहासाठी 70 रुपये मोजावे लागले.

एका प्रवाशाला 20 रुपयांच्या चहाच्या बिलासाठी 70 रुपये मोजावे लागले आहेत. हे पाहिल्यानंतर प्रत्येकजण म्हणत आहे की आजपर्यंत फक्त इतिहास बदलला होता पण पहिल्या देशाचे अर्थशास्त्र बदलले. फोटो व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

भारतीय रेल्वेने 2018 मध्ये या संदर्भात एक आदेश जारी केला होता. त्यानुसार राजधानी किंवा शताब्दी सारख्या ट्रेनमध्ये आरक्षण करताना प्रवाशाने जेवण बुक केले नाही आणि नंतर प्रवासादरम्यान चहा-कॉफी किंवा जेवणाची ऑर्डर दिली, तर त्यावर 50 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. तुम्ही चहाचा कप ऑर्डर केला असेल तरीही तुम्हाला तेवढाच सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे.