गाडीचा EMI भरण्यासाठी ९ लाखांच्या कांद्याची चोरी?

कांद्याच्या किंमती २०० रुपयांवर पोहचल्या आहेत.

Updated: Dec 9, 2019, 02:41 PM IST
गाडीचा EMI भरण्यासाठी ९ लाखांच्या कांद्याची चोरी? title=
संग्रहित फोटो

बंगळुरु : देशभरात कांद्याच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. कांद्याच्या किंमती २०० रुपयांवर पोहचल्या आहेत. यादरम्यान बंगळुरुमध्ये कांदा चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ईएमआय भरण्यासाठी ट्रक ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांनी जवळपास ९ लाख रुपयांच्या कांद्याची चोरी केल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर ट्रक दरीत ढकलून अपघात झाल्याची खोटी गोष्टदेखील त्यांनी सांगितल्याची माहिती आहे. 

तवारेकेरे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरिक्षक यांना शुक्रवारी रस्त्यालगत एक ट्रक दिसला. ट्रक चालकाने त्यांना कांद्याचा अर्ध्याहून अधिक भाग चोरी झाल्याचं सांगितलं. त्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं. कारण, महिला पोलीस उपनिरिक्षक या रात्री गस्तीवर होत्या. त्यावेळी अर्धातासापूर्वी तेथे कोणताही ट्रक नव्हता. 

त्यानंतर महिला पोलीस उपनिरिक्षक यांनी, इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. ड्रायव्हरने हिरियूरमध्ये कांद्याच्या ८१ गोण्या उतरवल्याचं आणि इतर गोण्या शहरातील बाजारात नेण्यासाठी दुसऱ्या वाहनांत ठेवल्याचं सांगितलं. ड्रायव्हरने जाणूनबुजून ट्रक दरीत ढकलल्याचंही कबूल केलं.  या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांकडून त्यांना पकडण्यात आलं असून त्यांनी आपला गुन्हाही कबूल केला आहे. ट्रकचं कर्ज भरण्यासाठी त्यांनी हे नाटक करत कांद्याची चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.