आम्ही करकरेंना शहीदच मानतो, साध्वींचे मत वैयक्तिक- भाजप

अनेक वर्षे छळ झाल्यामुळे साध्वींनी तसे म्हटले असेल

Updated: Apr 19, 2019, 07:33 PM IST
आम्ही करकरेंना शहीदच मानतो, साध्वींचे मत वैयक्तिक- भाजप title=

नवी दिल्ली: मुंबईवरील २६\११ हल्ल्याच्यावेळी प्राणांची आहुती देणारे पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपने हात वर केले आहेत. ते साध्वी प्रज्ञा यांचे वैयक्तिक मत आहे. आम्ही आजदेखील हेमंत करकरे यांना शहीदच मानतो, असे भाजपने पत्रक जारी करून स्पष्ट केले. 

साध्वी प्रज्ञासिंह यांनी शुक्रवारी करकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली. अनेकांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर सडकून टीकाही केली. 

या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकात भाजपने म्हटले आहे की, आमच्यासाठी करकरे शहीदच आहेत. साध्वी यांचे मत वैयक्तिक आहे. कदाचित तुरुंगात असताना भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टांमुळे त्या अशाप्रकारे व्यक्त झाल्या असाव्यात, अशी सारवासारव भाजपने केली आहे. 

साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणाचा तपास तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे होता. या प्रकरणात साध्वी मुख्य आरोपी होत्या. त्यावेळी एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्राबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सरकारने हेमंत करकरे यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान केले होते.