coronavirus: जान है, तो जहान है.... मोदींचा नागरिकांना सल्ला

'...अन्यथा देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल'

Updated: Mar 24, 2020, 11:22 PM IST
coronavirus:  जान है, तो जहान है.... मोदींचा नागरिकांना सल्ला title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरस अत्यंत वेगाने पसरत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. या कालावाधीत नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा साधा विचारही करू नये. अन्यथा देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मोदींनी यावेळी दिला. या २१ दिवसांच्या लॉकडाऊनची देशाला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. या काळात अनेकांच्या रोजगारावर गदाही येईल. मात्र, 'जान है तो, जहान है..' हे लक्षात ठेवा, असा सल्ला मोदींनी नागरिकांना दिला.

गेल्या काही दिवसांपासून राज्य पातळीवर लॉकडाऊन करूनही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाहीत. अनेकजण बाजारपेठा आणि रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता मोदींच्या सांगण्याने तरी या परिस्थितीत काही फरक पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कोरोनाचा वेग किती भयानक? आकडेवारी ऐकून तुमचा थरकाप उडेल

आपला देश आता एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. त्यामुळे आता आपण काय करतो, यावरच आपण कोरोनाला कितपत थोपवणार, हे अवलंबून असल्याचे मोदींनी सांगितले. जगातील सामर्थ्यशाली देशही उत्तम यंत्रणा आणि साधने उपलब्ध असतानाही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. त्यामुळे आपण असाच निष्काळजीपणा सुरु ठेवला तर देश उद्ध्वस्त होईल, असा इशारा मोदींनी यावेळी दिला.