जयपूर पोलिसांनी राजस्थानमधून अपहरण झालेल्या एका तरुणाची सुटका केली आहे. अपहरण केल्यानंतर त्याला हिमाचल प्रदेशातील ग्रामीण भागात बंदी ठेवण्यात आलं होतं. पोलीस जेव्हा मुलाची सुटका करण्यासाठी पोहोचले तेव्हा पीडित मुलासह अपहरणकर्तेही आश्चर्याने पाहत राहिले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पोलीस तरुणाला सांगत आहे की, 'अनुज, उठ बाळा. आम्ही जयपूर पोलीस आहोत, शांत राहा. आम्ही तुझ्यासाठी आलो आहोत'.
पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितलं आहे की, अनुज 18 ऑगस्ट रोजी जयपूरमधील नाहरगढ टेकडीवर मित्रासोबत गेला होता. ते तिथे असतानाच अपहरणकर्त्यांनी अनुजला पाहिलं होतं. त्याने घातलेले चांगले कपडे पाहून त्यांना तो श्रीमंत कुटुंबातील आहे असं वाटलं. त्यांनी त्याला पकडलं आणि नंतर हात-पाय बांधून जबरदस्ती गाडीत बसवलं. अपहरणकर्त्यांनी अनुजच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केला आणि पळून जाण्यापूर्वी त्याला रस्त्याच्या कडेला सोडून दिलं.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ड्रोनच्या माध्यमातून अनुजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. वादातून हे अपहरण झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली होती. यादरम्यान अपहरणकर्त्यांनी अनुजच्या कुटुंबाला फोन करुन 20 लाखांची खंडणी मागितली. इतकी मोठी रक्कम नसल्याने कुटुंबाने वेळ मागितला.
'Hello Anuj.. Jaipur Police' (This boy who got up after removing the blanket was kidnapped from Jaipur. Rajasthan police surprised him in this manner at a hotel in Solan, Himachal)
pic.twitter.com/c6GB3zWy9i— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 27, 2024
दुसरीकडे पोलीस फोन नंबर ट्रेस करत अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. अपहरणकर्ते वारंवार आपली जागा बदलत होते. अखेरीस, त्यांनी कुटुंबाला कालका-शिमला एक्स्प्रेस ट्रेनच्या शेवटच्या डब्यात पैसे पोहोचवण्याची सूचना केली.
पोलिसांनी योजना आखली आणि रेल्वेच्या मार्गावर पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. अपहरणकर्त्यांनी कुटुंबीयांना पैशांची बॅग धरमपूर रेल्वे स्थानकाजवळ टाकण्याची सूचना करताच एकाला अटक करण्यात आली. चौकशीत गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अनुजला ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते ते शोधून काढले. अपहरणकर्त्यांपैकी एक अनुजसोबत खोलीत झोपला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी अनुजची सुटका केली आणि अपहरणात सहभागी एक महिला आणि चार पुरुषांना अटक केली.
जयपुर पुलिस ने ऑपरेशन चेकमेट के तहत ब्रह्मपुरी क्षेत्र में नाहरगढ़ की पहाड़ी से युवक के अपहरण की वारदात का सफलतापूर्वक पर्दाफाश किया। अपहृत युवक अनुज को सुरक्षित मुक्त कराकर करवाया। इस मामले में शामिल 5 अभियुक्तों को गिरफ्तार किया, जिनमें एक महिला भी शामिल है। pic.twitter.com/K6gJqwvqvC
— Jaipur Police (@jaipur_police) August 27, 2024
वीरेंद्र सिंग, विनोद, अमित कुमार, जितेंद्र भंडारी आणि जमुना सरकार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपहरणामागील सूत्रधार वीरेंद्र सिंग हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आपल्या व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यामुळे, त्याने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर केला आणि अमित कुमार आणि विनोद सिंग, त्याच्या लिव्ह-इन पार्टनर जमुना सरकारसह खंडणीसाठी अपहरणाची योजना अंमलात आणली.
जितेंद्र भंडारीच्या मदतीने, त्यांनी आणखी एका मित्राचा समावेश केला आणि 18 ऑगस्ट रोजी जयपूरमधील नाहरगढ टेकडीवर पोहोचले. त्यांनी अपहरण करण्यासाठी वाहन, झोपेच्या गोळ्या, पाण्याच्या बाटल्या, कटिंग टेप, दोरी आणि चाकू, स्क्रू ड्रायव्हर अशी तीक्ष्ण हत्यारे सोबत आणली. दाट अंधारात वॉकीटॉकी आणि कोड शब्द वापरून त्यांनी अनुजचे अपहरण केलं होतं. दरम्यान अनुजची सुरक्षित सुटका केल्यानंतर जयपूर पोलिसांच्या शौर्याचं कौतुक केलं जात आहे.