निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे ८०० अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतलाय

Updated: Apr 5, 2019, 10:10 AM IST
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता title=

नवी दिल्ली : जम्मू - काश्मीर गेल्या काही महिन्यांत सातत्यानं धुमसताना दिसतंय. दहशतवादाच्या छायेनं इथले नागरिक भयभीत आहेत. गुप्तचर यंत्रणेनं पुन्हा एकदा या प्रदेशात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवलीय. गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार, दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचलाय. जैशचे दहशतवादी ५ ते ९ एप्रिल दरम्यान राज्यात दहशतवादी कृत्यं घडवून आणू शकतात. यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत मिळतेय. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेचा हा संदेश अतिशय महत्त्वाचा मानत सेना आणि सुरक्षा दलांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे ८०० अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतलाय.

गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, पाकिस्तान लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्यासाठी संधी शोधत आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयनं दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसहीत तीन टीम काश्मीर खोऱ्यासाठी बनवल्यात. या टीम निवडणुकीदरम्यान पोलिंग बूथ आणि उमेदवारांना आपलं लक्ष्य बनवू शकतात. 

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील शांती भंग करण्यासाठी 'आयएसआय' स्फोटकांचा वापर करण्यासाठी अफगानिस्तानात प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवादयांना खतपाणी घालत आहे. 
  
दरम्यान, पाकिस्तान लष्करानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. दिगवार आणि करमाडा सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. त्यात दोन जण जखमी झालेत. कमाल दीन आणि नसीम अख्तर अशी जखमींची नावं आहेत. जखमींवर पुंछमधल्या राजा सुखदेव सिंह रुग्णालयात उपचार सुरुयत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय. प्रशासनाकडून जखमींची विचारपूस करण्यात येतेय.