Jammu and Kashmir Bus Accident: गेल्या काही दिवसांपासून विविध रस्ते अपघातांत बळी गेलेल्यांचा आकडा पाहता रस्ते वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे रस्ते अपघातांची संख्या वाढलेली असतानाच दुसरीकडे आणखी एका भीषण अपघातानं पुन्हा एकदा सर्वांच्याच काळजात धस्स केलं. जम्मूतील अखनूर येथे गुरुवारी दुपारी एक अतिशय भीषण अपघात झाला. जम्मूच्याच शिव खोडी इथं भाविकांना नेणारी ही बस अपेक्षित स्थळी पोहोचण्यापूर्वीच ती 150 फूट खोल दरीत कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 20 भाविकांचा मृत्यू ओढावला, तर 57 भाविक जखमी झाले. अखनूर येथील अंतर्गत तुंगी मोड (चौकी चौरा) इथं ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. दरम्यान, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचंही जाहीर केलं.
पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साधारण 12:35 वाजण्याच्या सुमारास UP81CT-4058 क्रमांकाची बस खोल दरीत कोसळली. हरियाणातील कुरूक्षेत्रहून भाविकांना घेऊन जाणारी ही बस जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील पौनी इथं असणआऱ्या शिवखोडी इथं पोहोचणं अपेक्षित होतं. पण, प्रवाशांच्या नशिबात मात्र काही वेगळंच लिहिलं होतं.
बस अपघात इतका भीषण होता, की बचावपथक घटनास्थळी दाखल झालं तेव्हा मृतांचा आकडा वाढला होता. ज्यानंतर जखमींना तातडीनं अखनूर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. दरम्यान, अपघातासमयी नेमकं काय घडलं याची माहिती जखमींपैकीच एक असणाऱ्या अमरचंद यांनी दिली. ज्यावेळी त्यांच्या आवाजातून भीतीचं वेगळं रुप पाहायला मिळालं. 'दुसऱ्या बाजूनं एक कार येत होती. त्याचवेळी बसचालकानं एक चकवा देणारं धोकादायक वळण ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण, तितक्यातच त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि काही कळायच्या आतच बस खोल दरीत कोसळली', असं ते म्हणाले.
Anguished by the loss of lives due to a bus mishap in Akhnoor. My thoughts are with those who have lost their loved ones. I pray that the injured recover soon.
Rs. 2 lakh would be given to the next of kin of each deceased due to the bus mishap. The injured would be given Rs.…
— PMO India (@PMOIndia) May 30, 2024
या भयंकर अपघातानंतर जम्मू काश्मीर प्रशासनानं तातडीनं मदकार्य सुरु केलं. इतकंच नव्हे, तर 05722227041 आणि 05722227042 हे दूरध्वनी क्रमांक जारी करत त्यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी इतरही काही व्यवस्था केल्याचं पाहायसा मिळालं.