'मोठा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांवर पाकिस्तानचा दबाव होता'

हे तर आमचंही अपयश

Updated: Feb 15, 2019, 02:42 PM IST
'मोठा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांवर पाकिस्तानचा दबाव होता' title=

श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे असणाऱ्या अवंतीपोरा भागात गुरुवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून मोठा आत्मघाती हल्ला घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात ४४ जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या हल्ल्याचा देशभरातून विरोध होत असताना जम्मू- काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हे आपलंही अपयश असल्याचं वक्तव्य केलं आहे. 

ही कोणतीही सर्वसाधारण घटना नाही आणि यात आम्हीही कुठेतरी अपयशी ठरलो याचा मी स्वीकार करतो. आधी पाकिस्तानातून फिदायीन अर्थात आत्मघातकी हल्लेखोर, गुप्तहेर यायचे पण, यावेळी मात्र एका स्थानिक तरुणाचा फिदाईन म्हणून वापर करत त्याच्याकडून हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे, असं ते म्हणाले. हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे ही बाब त्यांनी धुडकावून लावली. रस्स्तावर स्फोटकांनी भरलेली एक कार आपण तपासण्यास असमर्थ ठरतो, म्हणजे या साऱ्यात कुठेतरी आपणही अपयशीच ठरलो असल्याचं त्यांनी म्हटलं. स्थानिक संरक्षण यंत्रणेवर अधिकाधिक लक्ष पुरवण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी प्रकर्षाने मांडला. 

'मी आत्मविश्वासानने सांगू शकतो की तो आरोपी (दहशतवादी) हा संशयितांच्या यादीतही समाविष्ट होता. त्याच्यावर असणारा शेजारी राष्ट्राचा दबाव पाहता त्याला स्थानिकांकडूनही आसरा मिळाला नव्हता. त्यामुळे मग तो जंगलांमध्ये, पर्वतरांगांमध्ये आसरा घेण्यास गेला. आम्हाला त्याच्याविषयी माहिती होती. पण, त्याचा सुगावा मात्र आम्हाला लागू शकला नाही'असं म्हणत त्यांनी आपण नेमके कुठे अपयशी ठरलो याविषयी माहिती दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन आपला  संपर्क झाल्याचंही त्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना स्पष्ट केलं. पुढची रणनीती ही सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतरच आखण्यात येईल. पण, येत्या तीन महिन्यांमध्ये आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करु', असा विश्वास त्यांनी दिला.  

सीमेपलीकडून फिदाईनवर वाढणाऱ्या दबावामुळे आणि संतापामुळे पुलवामा हल्ला झाल्याचंही ते म्हणाले. पाकिस्तानकडून या फिदाईनवर काहीतरही मोठा घातपात घडवून आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. परिणामी प्रचंड अस्वस्थतेतून जाणाऱ्या या हल्लेखोरांनी इतका मोठा आत्मघातकी हल्ला घडवून आणला, हे लक्षवेधी वक्तव्य त्यांनी केलं. मलिक यांचं हे वक्तव्य पाहता काश्मीर खोऱ्यातील तरुणाई आणि त्यांच्यात असणारी अस्वस्थता हे मुद्दे प्रकर्षाने समोर आणले.