Jammu-Kashmir : स्थलांतरीत मजूर दहशतीच्या छायेत, हत्येच्या भीतीने परतीच्या वाटेवर

जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या टार्गेट किलिंग प्रकरणानं साऱ्या देशाला हादरा दिला आहे

Updated: Oct 18, 2021, 05:12 PM IST
Jammu-Kashmir : स्थलांतरीत मजूर दहशतीच्या छायेत, हत्येच्या भीतीने परतीच्या वाटेवर title=

जम्मू-काश्मिर : जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगच्या (Targeted Killings) घटना उघडकीस येत आहेत. काश्मिरच्या कुलगाममध्ये (Kulgam) सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. यात दोन मजूर ठार झाले तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जीव वाचवण्यासाठी बिगर काश्मिर मजूर स्थलांतर करत आहेत. जम्मू रेल्वे स्थानकावर आपल्या राज्यात परतणाऱ्या मजूरांची गर्दी झाली आहे.

या महिन्यात जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 11 बिगर काश्मिरी लोकांची हत्या केली आहे. ओळखपत्र पाहून दहशतवादी लोकांना मारत आहेत. जम्मू-काश्मिरच्या काकापुरा इथं विट भट्टीत काम करणाऱ्या 25 ते 26 मजूरांनी पुन्हा आपल्या राज्यात छत्तीसगडमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमचे उरलेले पैसै परत मिळावेत अशी विनंती या मजूरांनी सरकारकडे केली आहे. तसंच काश्मिर खोऱ्यात कठोर कायदा-सुव्यस्था लागू करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आपल्या राज्यात परतल्यानंर पुन्हा काश्मिरमध्ये कधीच येणार नसल्याचं या मजूरांचं म्हणणं आहे. जम्मू-काश्मिर पोलिसांनी बिगर काश्मिरी मजूरांना शिबिरात स्थलांतरीत करण्याची मागणीही या मजूरांनी केली आहे. 

घरात घुसून गोळ्या मारल्या

रविवारी जम्मू-काश्मिरच्या कुलगाम परिसरात दहशतवाद्यांनी बिहारमध्ये राहणाऱ्या राजा ऋषिदेव आणि योगेंद्र ऋषिदेव या दोघांना गोळ्या मारून ठार केलं. या हल्ल्यात चुनचुन ऋषिदेव नावाचा मजूर गंभीर जखमी झाला आहे. 

भाजपकडून हत्येच्या घटनांचा निषेध

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोऱ्यातील हत्येच्या या घटनांचा निषेध केला आहे. भाजपकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले की, पाकिस्तान निर्दयपणे मानवतेची हत्या करत आहे. पाकिस्तानला याची मोठी किंमत मोजावी लागेल. सरकारने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईमुळे निराश होऊन पाकिस्तान या हत्या करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हत्येच्या घटनांवर दु:ख व्यक्त केलं आहे. नितीश कुमार यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी फोनवरुन आपली चिंता व्यक्त केली आहे. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले राज ऋषीदेव आणि योगेंद्र ऋषीदेव यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.