Jammu Kashmir : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद

 वारंवार शस्त्रसंधीचं होणारं उल्लंघन काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. 

Updated: Mar 18, 2019, 01:18 PM IST
Jammu Kashmir : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद  title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया, वारंवार शस्त्रसंधीचं होणारं उल्लंघन काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. सोमवारीही सकाळी पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीरच्या राजौरी येथील सुंदरबनी परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भारतीय सैन्यदलातील एक जवान शहीद झाल्याचं वृत्त एएनआयने प्रसिद्ध केलं आहे. 

सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार केला जात असून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. भारतीय सैन्यदलाकडूनही याचं प्रत्युत्तर देण्यात येत आहे. रविवारीसुद्धा अशाच प्रकारे पाकिस्तानकडून गोळीबारास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईत रायफल मॅन करमजीत सिंग यांना प्राण गमवावे लागले.

जम्मू- काश्मीर परिसरातील सीमेलगतची गावं आणि शस्त्रसंधीच्या भागात अशा प्रकारच्या घडामोडी घडत असतात. असं असलं तरीही फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुलवामा आत्मघाती हल्ल्यानंतर मात्र दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या संबंधांचं चित्र पुरतं बदललं. शस्त्रसंधीचं उल्लंघन होण्याचं प्रमाणही वाढलं असून, दोन्ही देशांमधील तणावात आणखी भर पडली.