वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार? धनंजय मुंडेंनी प्रश्न ऐकताच दिलं उत्तर, म्हणाले 'संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना....'

Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. त्यावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 2, 2025, 02:43 PM IST
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार? धनंजय मुंडेंनी प्रश्न ऐकताच दिलं उत्तर, म्हणाले 'संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना....' title=

Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. "मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो", असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
"वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. छोटा आका, मोठा आका अशी भाषा पहिल्यांदाच मी ऐकत आहे. एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी अतिशय व्यवस्थित तपास करत आहेत. संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर चढवणं हा आमचा पहिला उद्धेश आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार याला काही अर्थ नाही," असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 

वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले आहेत?

विजय वडेट्टीवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. 'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. माझी पोलिसांना विनंती आहे की, या मोठ्या आकाला वाचवण्याकरता याचा एन्काऊंटर करू नका? हा बिचारा म्हणणार नाही. पण मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर आहे तर पुरावा नष्ट होण्याची शक्यतादेखील जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानी दिली. त्यामुळं या प्रकरणात काहीही होऊ शकतं,' अशी शक्यता विजय वडेट्टीवारांनी वर्तवली आहे.

Santosh Deshmukh Murder: तुम्ही राजीनामा देणार का? धनंजय मुंडेंनी अखेर स्पष्टच सांगितलं; म्हणाले 'माझा हत्येशी...'

 

दरम्यान धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपली काही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. "मुळात या प्रकरणी ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी सर्वात आधी अधिवेशनात केली होती. त्यामुळे लगेचच चार्जशीट दाखल करुन, अटक करावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये मारेकऱ्यांना हत्येची शिक्षा मिळावी," असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 

राजीनामा देण्याच्या मागणीसंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, "मी राजीनामा का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. मी ना आरोपी आहे किंवा माझा काही संबध आहे. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा यापद्धतीने मागणी केली जात आहे". 

तुमचा मंत्री म्हणून तपासावर प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने राजीनामा घ्यावा या विरोधकांच्या मागणीसंदर्भात ते म्हणाले की, "म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिला आहे. हा तपास न्यायालयीनही होणार आहे. मंत्री म्हणून कोणताही प्रभाव पाडू शकत नाही म्हणूनच सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन तिन्ही चौकशी सुरु आहेत. मीच पालकमंत्री, मंत्री नसावं याचा विरोध करणाऱ्यांना प्रश्न विचारला तर बरं होईल".

सर्वपक्षीय आमदारांनी एकवटणं एका निर्घृण हत्येविरोधात आहे. त्यामुळे त्यात चुकीचं नाही. ती घटना अतिशय दर्दवी आहे, जे दोषी असतील त्यांना फाशी व्हावी अशी आपली भूमिका स्पष्ट केली. जे निर्णय अजित पवार घेतील तो मान्य असेल असंही ते म्हणाले.