श्रीनगर : संरक्षण दलांच्या साथींनं अतिशय मोठी कारवाई करत Jammu kashmir जम्मू काश्मीर पोलिसांच्या तुकडीनं उत्तर काश्मीरच्या बांदीपोर जिल्ह्यात दहशतवादी संघटनांशी संलगन असणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये या चौघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याच्या माहितीचा सुगावा लागल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांच्या साथीनं जम्मू काश्मीर पोलिसानी बांदीपोरच्या चंदरगीर भागात एक शोधमोहिम सुरु केली. ज्यामध्ये त्यांनी दहशतवाद्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतलं.
अटक करण्यात आलेला व्यक्ती चंदरगीर भागातील असून, शफात अहमद डार असं त्याचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून हँड ग्रेनेडसह इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईसोबतच साधुनारा येथेही करण्यात आलेल्या एका कारवाईतून दहशतवागी संघटनेच्या संपर्कात असणाऱ्या आणखी तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं. मुदासिर अहमद ख्वाजा, अब्दुल कयूम मार्गो आणि इशफाक अहमद डार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. हे तिघंही साधुनाराचेच रहिवासी असल्याचं कळत आहे.
अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र जप्त
अटक करण्यात आलेल्यांकडून ग्रेनेड, एक एके मॅग्जिन, एके 47, 25 लाईव्ह राऊंड, एक अंडर बॅरल लाँचर यासह इतरही सामग्री जप्त करण्यात आली आहे. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेला हे चौघेही शस्त्र, माहिती आणि त्यांच्या काही कारवायांच्या आखणीसाठी जागा उपलब्ध करुन देत होते अशी माहिती समोर येत आहे.