काँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पर्यायाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 21, 2017, 04:50 PM IST
काँग्रेस आघाडीला मोठा धक्का, नितीश कुमारांचा कोविंदना पाठिंबा title=

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पर्यायाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

पाटण्यात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊ भाजपचा सामना करावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी घेतली होती. मात्र, त्यांनीच आपल्या भूमिकेवर पलटी मारलेय.

नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना औपचारिक पाठिंबा दिल्याने कोविंद यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे. यामुळे कोविंद यांच्या पारड्यात जवळपास ७० टक्के मते जाण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस नेतृत्त्वाकडून गुरुवारी विरोधी पक्षांची बैठक घेतली जाऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील द्रमुक पक्षदेखील आता कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नितीश कुमार सोबत असावेत, यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले. मात्र नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ झालेय. विरोधी पक्षांसोबतच राहू, असा विश्वास नितीश कुमार यांनी काँग्रेसकडे व्यक्त केला होता. या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत नितीश कुमार यांनी मंगळवारी बराच वेळ चर्चादेखील केली होती. पण यश आलेले नाही.