धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही

MS Dhoni : झारखंडच्या रांचीमध्ये एका दीड वर्षाच्या मुलाचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून पोलिसांच्या हाती अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

आकाश नेटके | Updated: Oct 27, 2023, 09:45 AM IST
धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही title=

Crime News : झारखंडमधून (Jharkhand) अपहरणाची (kidnapp) एक विचित्र घटना समोर आली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नावाने एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपासून पासून हा चिमुकला बेपत्ता असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत. दुसरीकडे मुलाच्या कुटुंबियांना या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अशा प्रकारे अपहरण झाल्याने झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस (Jharkhand Police) या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

झारखंडमध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावाने आरोपींनी एका दीड वर्षाच्या मुलाचे विचित्र पद्धतीने अपहरण केले. लेडी डॉनने रांचीमध्ये गरीब लोकांना धोनीच्या नावाने 5 हजार रुपये घर देण्याचे आश्वासन देऊन मुलाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.

झारखंडमध्ये एका गुन्हेगाराने क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचे नाव वापरून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याची नवीन पद्धत वापरली आहे. जगन्नाथपूर येथील रहिवासी असलेल्या मधु देवी आपल्या दोन मुलांसह रांचीच्या हिन्नू येथील एका स्टॉलवर खरेदी करत होत्या. तेवढ्यात अचानक एक तरुण आणि एक महिला बाईकवर तिथे पोहोचले. ती महिला लेडी डॉन होती. दोघांनी महिलेची फसवणूक केली आणि तिला सांगितले की क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी गरीबांना 5,000 रुपये आणि घरे वाटप आहे. तुला हवं असल्यास, आपल्याला ताबडतोब निघावे लागेल. मधु देवी त्यांच्या बोलण्यात फसली आणि तिने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मधूने 8 वर्षाच्या मुलीला त्याच स्टॉलवर सोडले आणि दीड वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन बाईकवर बसली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी महिलेला काही अंतरावर नेले.

दोन्ही आरोपींनी मधूला हरमू येथील वीज कार्यालयापर्यंत नेले आणि खाली उतरायला सांगितले. या कार्यालयात गरिबांमध्ये पैसे वाटण्याबाबत बैठक सुरू असल्याचे आरोपींनी मधूला सांगितले. मधूचे लक्ष विचलित होताच महिला गुन्हेगाराने दीड वर्षांच्या मुलाला उचलले. तितक्यात दुसऱ्या आरोपीने बाईक सुरु केली आणि दोघांनीही तिथून पळ काढला. हा प्रकार पाहून मधू घाबरली आणि तिने त्यांच्या मागे धाव घेत आरडाओरडा सुरु केला. मात्र दोघेही पळून गेले. याप्रकरणी मधूने तात्काळ आरगोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरु केला.

दरम्यान, पोलीस घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजच्या आधारे गुन्हेगारांचा तपास करत आहेत. मात्र तीन दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नाही. अद्यापपर्यंत अपहरणकर्त्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना मिळालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मुलाला लवकरात लवकर शोधून काढण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

दुसरीकडे, तक्रारदारही घटनेच्या माहितीवर कायम नाही आहे. सुरुवातीला महिलेने सांगितले की, सरकार गरिबांना पैसे वाटून देत असल्याचे सांगून अपहरणकर्त्यांनी आपल्याला फूस लावली. मग ती म्हणाला की अपहरणकर्त्यांनी सांगितले की एमएस धोनी गरिबांना पैसे वाटत आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या जबाबाचाही कसून चौकशी करण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.