काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंड हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात केलेलं विधान राहुल गांधी यांना भोवण्याची शक्यता आहे. कोर्टाने याप्रकरणी निर्णय सुनावताना राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. आता याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार आहे. राहुल गांधी यांनी एमपी एमएलए कोर्टाच्या समन्सविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मागील सुनावणीत कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.
राहुल गांधी यांनी 2018 मध्ये बंगळुरुत भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर तत्कालीन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राहुल गांधींनी ट्रायल कोर्टात सुरु असलेली कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 16 फेब्रुवारीला राहुल गांधींनी कोर्टात लेखी अर्ज सादर केला होता. यानंतर न्यायमूर्ती अंबुज नाथ यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता.
याआधी राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान करणं महागात पडलं होतं. मोदींच्या आडनावावरुन उल्लेख करत केलेल्या विधानासाठी सूरत कोर्टाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. यामुळे त्यांना लोकसभेचं सदस्यत्व गमवावं लागलं होतं. पण नंतर सुप्रीम कोर्टाने निर्णयावर स्थगिती आणली आणि राहुल गांधींना पुन्हा एकदा सदस्यत्व बहाल केलं.