'जेएनयू'त जोरदार राडा; विद्यार्थी नेता आइशी घोष जखमी

या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभविप) हात असल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने केला आहे. 

Updated: Jan 5, 2020, 09:35 PM IST
'जेएनयू'त जोरदार राडा; विद्यार्थी नेता आइशी घोष जखमी title=

नवी दिल्ली: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी काही गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात 'जेएनयू'तील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशा घोषसह अनेकजण जखमी झाले आहेत. तोंडावर मास्क लावलेल्या काही गुंडांनी काठ्या आणि विटांच्या सहाय्याने या विद्यार्थांना मारहाण केली. या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभविप) हात असल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने केला आहे. 

'जेएनयू'तील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अभविप'च्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोलीस उपस्थित असतानाही काठ्या आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. या हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी जेएनयू हॉस्टेलच्या आवारात विटा फेकल्या. यानंतर हॉस्टेलच्या भिंतीवरून चढून आतमध्ये प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली. यामध्ये 'जेएनयू'तील विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आइशा घोष हिचाही समावेश होता. तिच्या डोक्यातून बराच रक्तस्त्राव झाला. या जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल सात रुग्णवाहिका 'जेएनयू'त पाठवण्यात आल्या. गुंडांकडून ही मारहाण सुरू असताना विद्यार्थी सैरावरा पळत होते. यावेळी पोलीसही गुंडांना मदत करत होते. हे गुंड प्रत्येक विद्यार्थ्याला पकडून 'भारत माता की जय' घोषणा द्यायला लावत होते, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. 

मात्र, 'अभविप'ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याउलट AFSI, AISA आणि DSF याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा 'अभविप'चा दावा आहे. या घटनेत 'अभविप'चा नेता मनिष जांगिडही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या प्रकारानंतर 'जेएनयू' विद्यापीठाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

या सगळ्यावरून दिल्लीतील राजकारणही प्रचंड तापले आहे. या हिंसाचारामुळे मला मोठा धक्का बसला. विद्यार्थ्यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली आहे. जर आपल्याकडे विद्यार्थी सुरक्षित नसतील तर देश प्रगती कशी करणार, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.