कामाचा ताण येतो म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'त्या' कंपनीनं खरंच कामावरून काढलं? अखेर सत्य उघड

Job News : हे किती वाईट आणि क्रूर! आताच्या आता घरी जा... भारतातील कोणत्या कंपनीनं 100 कर्मचाऱ्यांना मेल करत दाखवला बाहेरचा रस्ता?    

सायली पाटील | Updated: Dec 10, 2024, 01:23 PM IST
कामाचा ताण येतो म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'त्या' कंपनीनं खरंच कामावरून काढलं? अखेर सत्य उघड title=
job news startup YesMadam mass layoffs post HR email about stress

YesMadam layoffs: नोकरी, नोकरीच्या ठिकाणी असणारी बांधिलकी आणि जबाबदारी या सर्व संकल्पना मागील काही वर्षांमध्ये पुरत्या बदलल्या. कैक वर्षे एखाद्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जागा आता पगाराप्रमाणं नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आणि विविध प्रस्थापिक संस्थांना काही नव्या संस्थांचे पर्यायही उपलब्ध झाले. पण, हे पर्याय जितक्या वेगानं उदयास आले तितक्याच वेगानं नोकरदार वर्गासाठी लागू असणारी धोरणंही नव्यानं आकारास आली आणि Job Risk हा मुद्दा पाळंमुळं पसरताना दिसला. सध्या याच मुद्द्याची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे दिल्लीतील एका कंपनीत झालेली कर्मचारी कपात. (Job News)

जागतिक आर्थिक मंदी, त्याचे अर्थसंस्थेवर होणारे परिणाम या आणि अशा अनेक कारणांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. सध्या मात्र दिल्लीतून एक असं प्रकरण समोर आलं आहे जिथं कंपनीतील HR विभागाच्या विक्षिप्तपणाचा कळत अनेकांचीच तळपायाची आग मस्तकात पोहोचवण्यात कारणीभूत ठरत आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळं हा सर्व प्रकार उघडकीस आला. जिथं (YesMadam) नावाच्या एका कंपनीतून 100 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नारळ दिल्याचं म्हटलं गेलं. 

मानसिक आरोग्याविषयीचा सर्वे ठरला नोकरकपातीचं निमित्तं... 

वरील कंपनीमध्ये नोकरीला असणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पोस्टमुळं घडला प्रकार उघडकीस आला जिथं कंपनीत एक मानसिक आरोग्यविषय सर्वेक्षण (Mental Health Survey) केल्याचं सांगण्यात आलं. कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती, त्यांच्यावर असणारा कामाचा ताण या आणि अशा गोष्टींच्या आधारे समोर आलेले निष्कर्ष पाहून HR नं थेट कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं. कामाचा ताण येत असल्याचा सूर ज्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आळवला त्यांना नारळ देण्याचा हा निर्णय अनेक नेटकऱ्यांना आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना पटला नाही, पाहता पाहता कंपनीला होणारा विरोध प्रचंड प्रमाणात वाढला आणि अखेर मूळ परिस्थिती समोर आली. 

हेसुद्धा वाचा : पुरेसा सूर्यप्रकाश अन् हवा; CIDCO च्या 'या' घरांसाठी अर्ज करायचाय? शेवटची तारीख काय? 

होणारा हा विरोध पाहता आता याच कंपनीच्या वतीनं अधिकृत माहिती देत काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. "No one was fired at YesMadam!  असं म्हणत आपल्या कंपनीतून कोणालाही काढण्यात आलं नसून कंपनी कधीच असं अमानवी पाऊल उचलणार नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं. इतकंच नव्हे, तर मानसिक आरोग्यासंदर्भातील ती पोस्ट एका उपक्रमाचा भाग असून, नोकरीच्या ठिकाणी मानसिक आरोग्य आणि तत्सम मुद्द्यांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाकडे यानिमित्तानं लक्ष वेधण्याचा कंपनीचा मानस होता. 

आपल्या कंपनीतून कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्यात आलं नसून, उलटपक्षी कंपनी कर्मचाऱ्यांना डिस्ट्रेल लिव्ह अर्थात तणावाच्या परिस्थितीत असल्यास त्यातून मोकळं होण्यासाठी म्हणून 6 दिवसांची रजाही दिली जाते असं सांगण्यात आलं आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.