पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

पत्रकार रामचंद्र हत्येप्रकरणी राम रहीम दोषी असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. 

Updated: Jan 11, 2019, 04:06 PM IST
पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी राम रहीम दोषी title=

नवी दिल्ली : पत्रकार रामचंद्र हत्येप्रकरणी राम रहीम दोषी असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. आता याप्रकरणी पुढची सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे. याप्रकरणी पंचकूला विशेष सीबीआय कोर्टाने हा निर्णय दिला आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम आधीच एका गुन्ह्यात जेलची हवा खातोय. या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि पंजाब येथील संवेदनशील भागात पोलिस हाय अलर्टवर असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम रहीम सहित 4 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. या दोषींना 17 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येईल. रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणात सीबीआयचे साक्षीदार पत्रकार आरके सेठी यांनी कोर्टात राम रहीमला फाशी देण्याची मागणी केली आहे.

हरियाणाच्या खासकरुन पंचकूला, सिरसा( डेरा मुख्यालय) आणि रोहतक जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. दंगल विरोधी पथक आणि कमांडोही याठिकाणी आहेत. सर्व जिल्ह्यात जमाव बंदी लागू करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

काय आहे प्रकरण ?

रामचंद्र छत्रपती यांची 21 नोव्हेंबर 2002 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छत्रपतींनी साध्वींसोबत झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला होता. छत्रपती यांनी आपल्या वर्तमानपत्रात 'पूरा सच मध्ये या संबंधित एका साध्वीचं पत्र प्रकाशित केलं होतं. या प्रकरणात 2003 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. 2006 मध्ये हे प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आले होते. छत्रपती यांचा पूत्र अंशुल छत्रपती यांचं म्हणणं आहे की, त्याच्या वडिलांना आज न्याय मिळणार आहे. अंशुल 16 वर्षांपासून वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी संघर्ष करत आहे.

आज कोर्टात सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. साध्वी यौन शोषण प्रकरणात राम रहीम दोषी ठरल्यानंतर पंचकुला आणि हरियाणामध्ये त्याच्या अनुयायांनी हिंसा घडवली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.