मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा राजीनामा

मध्य प्रदेशात १५ महिने सत्तेवर असलेलं कमलनाथ सरकार अखेर कोसळलं.  

Updated: Mar 20, 2020, 02:55 PM IST
मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा राजीनामा title=

भोपाळ : मध्य प्रदेशात १५ महिने सत्तेवर असलेलं कमलनाथ सरकार अखेर कोसळलं. काँग्रेसच्या २२ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अस्थिर झालेल्या कमलनाथ यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं टाळून थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील हे आता निश्चित मानलं जात आहे.

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंड करून भाजपची साथ दिल्यानंतर त्यांच्या समर्थक २२ आमदारांनी बंगळुरुमध्ये मुक्काम ठोकत राजीनामा दिला होता. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मांडण्याचं आव्हान भाजपनं दिलं होतं. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी टाळाटाळ केली होती. तर कमलनाथ यांनी कोर्टात दाद मागितली होती.

काँग्रेसच्या आमदारांना डांबून ठेवल्याचा आरोप करत त्यांचे राजीनामे स्वीकारण्यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिला होता. सहा मंत्र्यांचे राजीनामे मात्र त्यांनी स्वीकारले होते. 
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, काल रात्री विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर २२ आमदारांचे राजीनामे स्वीकारल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हाच कमलनाथ सरकार कोसळणार हे निश्चित झालं होतं. दरम्यान, आज भाजपच्या एका आमदारानंही राजीनामा दिल्यानं मध्य प्रदेशात एकूण २३ आमदारांचे राजीनामे अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. 

कमलनाथ यांनी आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आणि १५ महिन्यांत केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत भाजपनं लोकशाहीचा गळा घोटल्याची टीका त्यांनी केली. धोका देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं सांगत राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार असल्याची घोषणा कमलनाथ यांनी केली.