अपघात की घातपात? साबरमती एक्स्प्रेसच्या अपघातामुळं यंत्रणाही चक्रावल्या... घटनास्थळी सापडली 'ही' वस्तू

Sabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री उशिरा झांसी मंलल भागाजवळ गोविंदपुरी स्थानकानजीक जवळपास 2 वाजून 30 मिनिटांनी भीषण रेल्वे अपघात झाला.   

सायली पाटील | Updated: Aug 17, 2024, 10:14 AM IST
अपघात की घातपात? साबरमती एक्स्प्रेसच्या अपघातामुळं यंत्रणाही चक्रावल्या... घटनास्थळी सापडली 'ही' वस्तू  title=
Kanpur train accident Sabarmati Express Train Derail due to boulder IB investigation

Sabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री अगदी उशिरा, जवळपास 2 वाजून 35 मिनिटांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातादरम्यान रेल्वेचे 22 डबे रुळांवरून घसरले. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीसुद्धा ट्विट करत घटनेची दखल घेतली. साबरमती एक्स्प्रेस (वाराणासी ते अहमदाबाद) या रेल्वे गाडीचं इंजिन सकाळी 2 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात गोष्टीवर आदळून त्यानंतर हा अपघात घडल्याचं ते म्हणाले. 

कानपूर येथे झालेल्या या भीषण रेल्वे अपरघातानंतर काही अशा गोष्टी समोर आल्या ज्यामुळं हा अपघात होता की घातपात? हाच प्रश्न उपस्थित केला गेला. सदर अपघातानंतर 16 व्या कोचपाशी काही वस्तू आढळल्या. रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर सापडलेले पुरावे सुरक्षित हाती सोपवण्यात आले असून, आयबी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं तपासही हाती घेतला आहे. दरम्यान या अपघातामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं प्रवाशांसाठी अहमदाबादच्या दिशेनं जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेची व्यवस्था करून देण्यात आली. 

 

रेल्वेचालकांच्या माहितीनुसार प्रथमदर्शनी रेल्वेचं इंजिन बोल्डरवर आदळल्यामुळं अपघात झाल्याचं लक्षात आलं. बोल्डर ज्या पद्धतीनं इंजिनवर आदळला त्या क्षणी लगेचच इंजिनाची दिशा बदलली. दरम्यान रेल्वे अपघातानंतर एकिकडे तपासाला वेग आलेला असतानाच दुसरीकजडे रेल्वेनं तातडीनं कंट्रोल रूम सक्रिय करत हेल्पलाईन क्रमांक जारी केले. या सर्व परिस्थितीमध्ये काही रेल्वेगाड्या रद्दही करण्यात आल्या. 

 

हेल्पलाईन क्रमांक  

  • गोरखपुर - 0551-2208088
  • बनारस सिटी- 8303994411
  • अहमदाबाद- 07922113977
  • टुंडला- 7392959702
  • मिर्जापुर- 054422200097
  • कानपुर - 0512-2323018, 0512-2323015
  • प्रयागराज - 0532-2408128, 0532-2407353

कोणत्या रेल्वे रद्द? 

01814/01813 (कानपुर-वी झांसी) JCO 17.08.24
01887/01888 (ग्वालियर-इटावा) JCO 17.08.24
01889/01890 (ग्वालियर-भिंड) JCO 17.08.24
01823/01824 (वी झांसी-लखनऊ) JCO 17.08.24
11109 (वी झांसी-लखनऊ जंक्शन) JCO 17.08.24
01802/01801 (कानपुर-मानिकपुर) JCO 17.08.24