Kanyadan Not Essential : हिंदू विवाहसंस्थेमध्ये आणि विवाहपद्धतीमध्या काही प्रथांना अतिशय महत्त्वं आहे. कन्यादान (Kanyadan) ही त्यापैकीच एक परंपरा. पण, न्यायालयानं मात्र त्यासंदर्भात एक वेगळा विचार मांडला आहे. अलाहबाद उच्च न्यायालयानं नुकत्याच केलेल्या एका पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीदरम्यान हिंदू विवाहामध्ये कन्यादानाची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट करत ही याचिका फेटाळली.
याचिकाकर्त्यांनी कन्यादानाला हिंदू विवाहाती अनिवार्य प्रथा मानत त्यासाठी न्यायालयापुढं साक्षीदारांचा उल्लेख केला होता. पण, न्यायालयानंच ही याचिका फेटाळून लावली. कन्यादान अर्थात मुलगी दान करण्याचं प्रतीक असणारा हा विधी हिंदू विवाह कायद्याअंतर्गत महत्त्वाचा नसून, सप्तपदीच (Saptapadi) महत्त्वाची असल्याचं न्यायालयानं विवाह कायद्यातील अनुच्छेद 7 चा संदर्भ देत स्पष्ट केलं. उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानं यासंदर्भातील निरीक्षण नोंदवलं. परिणामी न्यायालयाच्या निकालानुसार हिंदू विवाह कायदा 1955 च्या अनुच्छेद 7 प्रमाणं सर्व तरतुदी पूर्ण झाल्यास आणि कोणी कन्यादानाशिवाय विवाह केल्यास त्यांचं लग्न वैध मानलं जाईल.
काळानुरूप समाजातील शैक्षणिक, कलाजगत, व्यावसायिक, खेळ आणि इतर क्षेत्रांतील महिलांनी गाठलेली उंची पाहता हा विधी किंवा ही प्रक्रिया साचेबद्ध आणि पुरुषप्रधान समाजालाच दर्शवते असंही निरीक्षण यावेळी प्रकाशात आलंय. दरम्यान, कन्यादानासंदर्भात अनेक स्तरांतील महिलांनीही या विधीबाबत संमिश्र मत मांडण्यास सुरुवात केली होती.
हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत कोणत्याही हिंदू विवाहाच्या वैधतेसाठी सप्तपदीचा विधी होणं अनिवार्य आहे. या विधीमध्ये वधू आणि वर अग्निच्या साक्षीनं लग्नाच्या बंधनात वचनबद्ध होतात. दरम्यान, कन्यादानाच्या विधीचा उल्लेख लग्न संपन्न होण्यासाठी अनिवार्य नाही. विवाह कायद्याच्या अनुच्छेद 7 नुसार लग्नादरम्यान सप्तपदी घेणं, मंगळसूत्र घालणं, अग्निच्या साक्षीनं वचनबद्ध होणं महत्त्वाचं असून, त्यात कुठंही कन्यादानाचा उल्लेख आढळत नाही.