मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र कोरोनाच्या नव्या विविध वेरिएंटने मात्र चिंता वाढवली आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसनंतर आता कप्पा नवा वेरिएंट समोर आला आहे. तर राजस्थानमध्ये या वेरिएंटचे आतापर्यंत 11 रूग्ण समोर आले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. रघु शर्मा यांच्या सांगण्यानुसार, आतापर्यंत 11 कप्पा वेरिएंटच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. या 11 पैकी 4 रूग्ण हे जयपुरमधील तर 4 रूग्ण अलवरमधील आहेत. 2 रूग्ण बाडमेर आणि 1 रूग्ण भीलवाडामधून असल्याची नोंद करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री डॉ. शर्मा यांच्या सांगण्यानुसार, कप्पा वेरिएंट हा डेल्टा वेरिएंटच्या तुलनेत कमी धोकादायक आहे. मुख्य म्हणजे लोकांनी कोरोनाच्या नियमांचं योग्य पद्धतीने पालन केलं पाहिजे.
राजस्थानमध्ये 13 जुलैपर्यंत कोरोनाच्या 9.53 लाखांपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी गेल्या 24 तासांमध्ये याठिकाणी 28 नवे रूग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 9.43 लाखांपेक्षा जास्त रूग्ण बरेही झाले आहेत. यामध्ये 8945 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
देशातंच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता अनेक देशांमध्ये डेल्टा वेरिएंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आतापर्यंत डेल्टा वेरिएंटने 104 देशांमध्ये एन्ट्री केली आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस यांनी दिलीये.