बंगळुरू : कर्नाटक विधासभेत गेल्या दोन दिवसांपासून बहुमत परीक्षणावर सुरु असलेल्या गोंधळा दरम्यान राज्यपालांनी गेल्या २४ तासांत मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी दुसरी चिठ्ठी धाडलीय. कर्नाटकातलं नाट्य संपायला तयार नाही. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दुसरं स्मरण पत्र पाठवून आजच सायंकाळी सहा वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी राज्यपालांनी दुपारी १.३० वाजेपर्यंत फ्लोअर टेस्ट करण्यास सांगितलं होतं. परंतु, विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी 'जेव्हापर्यंत चर्चा पूर्ण होत नाही, भाजपा बहुमताचा आग्रह करू शकत नाही, असं म्हटलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र धाडलंय. त्यामुळे त्यांचा आदेश मानायचा की नाही हा निर्णय कुमारस्वामी यांचा असेल' असं म्हटलं.
कुमारस्वामींनी बहुमत गमावल्याचाही उल्लेख राज्यपालांनी आपल्या पत्रात केलाय. या दरम्यान कर्नाटक काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केलीय. '१५ बंडखोर आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्यासाठी बाध्य केलं जाऊ शकत नाही. पक्ष आमदारांना यासाठी व्हिप जाहीर करू शकत नाही' असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. या निर्णयाविरुद्धच काँग्रेसनं पुन्हा एकदा याचिका दाखल केलीय.
यावरच बोलताना, राज्यपाल वाजूभाई वाला यांनी मला पुन्हा एकदा 'लव्ह लेटर' पाठवल्याचा टोला कुमारस्वामी यांनी लगावला. कुमारस्वामी यांनी राज्यपाल यांच्या स्मरण पत्राचा उल्लेख 'लव्हलेटर' असा केला. राज्यपालांनी मला पाठवलेल्या स्मरण पत्रात घोडेबाजाराचा उल्लेख केलाय. यापूर्वी झालेल्या घोडेबाजाराबाबत राज्यपाल गप्प का? असा सवाल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलाय.
इतकंच नाही तर माझ्याकडे घोडेबाजाराचे पुरावे आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काही फोटोही अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहेत.