बीएस येडियुरप्पा: गिरणी कारकुनाचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास

येडियुरप्पांचा प्रवास मोठा संघर्षमय आहे. या प्रवासावर टाकलेला एक कटाक्ष... 

Updated: May 15, 2018, 12:28 PM IST
बीएस येडियुरप्पा: गिरणी कारकुनाचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास title=

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्याशिवाय भाजपचा विचार करने अशक्य होऊन बसले आहे. सत्ता मिळविण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पातळीवरही जे काही करावे लागते, ते सर्व प्रयोग करून येडीयुरप्पा हे कर्नाटकचे किंग ठरू पाहतायत. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आल्यावर आगोदरच घोषीत केल्याप्रमाणे येडियुरप्पा हे मुख्यमंत्री होतील. पण, तांदूळ गिरणीतील एक कारकूण ते मुख्यमंत्री हा येडियुरप्पांचा प्रवास मोठा संघर्षमय आहे. या प्रवासावर टाकलेला एक कटाक्ष... 

  • माड्या जिल्ह्यातील बुकानाकेरे येथे २७ फेब्रुवारी १९४३मध्ये एका लिंगायत परिवारात येडियुरप्पांचा जन्म झाला. लिंगायत मतांचा कर्नाटकच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव आहे. येडियुरप्पा हे आपल्या विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रीय राहिले आहेत. 
  • १९६५मध्ये सामाजिक कल्याण विभागात प्रथम श्रेणी क्लर्कच्या रूपात येडियुरप्पांनी नोकरीला प्रारंभ केला. पण, काही दिवसांतच नोकरीचा राजीनामा देत ते शिकारीपुराला गेले. तेथे त्यांनी वीरभद्र शास्त्री शंकर तांदूळ गिरणीत काम करण्यास सुरूवात केली. आपल्या महाविद्यालयीन जिवनात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यात आले. १९७० मध्ये त्यांनी सामाजिक सेवा करण्यास सुरूवात केली. कालांतराने त्यांना याच परिसराचे कार्यवाहक म्हणून जबाबदारी देण्यात आली.
  • सन २००७ मध्ये कर्नाटकमध्ये आलेल्या राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. ज्यानंतर जेडीएस आणि भाजपने आपसातील मतभेद दूर केले. हे मतभेद दूर होण्याचा परिणाम म्हणून १२ नोव्हेंबर २००७मध्ये भाजप कर्नाटकातील सत्ताधारी पक्ष ठरला.
  • येडियुरप्पा हे एक असे नेते आहेत, ज्यांच्यामुळे भाजपने दक्षिण भारतात केवळ विजयच नव्हे तर, सत्तासोपनही चढला. पण, विशेष असे की, सत्तेच्या काळात येडियुरप्पा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले. तीन वर्षे सत्ता उपभोगल्यामुळे खाण घोटाळा प्रकरण पुढे आल्यावर येडियुरप्पांना खुर्ची सोडण्यावाचून पर्याय राहिला नाही. 
  • शिकारीपुरा हा येडियुरप्पा आणि भाजपचा पारंपरिक आणि तितकाच सुरक्षित गड आहे. त्यामुळे इथे विजय मिळवणे विरोधकांना फारसे शक्य होत नाही. या मतदारसंघात १९८३ पासून येडियुरप्पा विजयी होत आले आहेत. अपवाद केवळ महालिंगप्पांचा. १९९९मध्ये काँग्रेसचे महालिंगप्पा या मतदारसंघात विजयी झाले होते आणि येडियुरप्पांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
  • मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाताच येडियुरप्पांनी भाजपाशी फारकत घेतली. त्यानंतर ते राजकारणात वेगळी वाट चोखाळतील असे काही काळ वाटले. पण, त्यांनी पुन्हा भाजपशी जुळवून घेतले आणि आता तर, ते भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवारच झाले.
  • २०१३ नंतर भाजपने पुन्हा एकदा येडियुरप्पांच्या नावावर कर्नाटकात डाव लावला आणि त्यात ते यशस्वी होत आहेत असे दिसत आहे.