सीबीआयने तिहार जेलच्या आतमधून बीआरएसच्या के कविता यांना केली अटक; नेमकं असं काय झालं?

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 11, 2024, 05:00 PM IST
सीबीआयने तिहार जेलच्या आतमधून बीआरएसच्या के कविता यांना केली अटक; नेमकं असं काय झालं? title=

भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सीबीआयने तिहार जेलच्या आतमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी सीबीआयने कारवाई केली आहे. के कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने मनी लाँड्रिंग प्रकरणी जेलमध्ये त्यांची चौकशी केली होती. यानंतर आता त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांच्या कन्या के कविता यांच्यावर 'दक्षिण ग्रुप'च्या प्रमुख सदस्य असल्याचा आरोप आहे, ज्यांनी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला राजधानी दिल्लीत मद्य परवानाच्या मोबदल्यात 100 कोटी रुपये दिले होते. गेल्या मंगळवारी कोर्टाकडून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 15 मार्चला सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादच्या बंजारा हिल येथून त्यांना अटक केली होती. 

विशेष न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी कविता यांची तुरुंगात चौकशी केली होती. सहआरोपी बुची बाबूच्या फोनमधून मिळालेले व्हॉट्सॲप चॅट्स आणि जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ही चौकशी करण्यात आली होती.  राजधानीत मद्य लॉबीच्या फायद्याकरिता अबकारी धोरण बदलण्यासाठी आम आदमी पक्षाला 100 कोटींची रक्कम कथितरित्या दिली गेली होती असा आरोप आहे. 

सीबीआयचे अधिकारी शनिवारी कविता यांची या सर्व प्रकरणी चौकशी करण्यासाठी तिहार जेलमध्ये पोहोचले होते. दरम्यान कविता यांनी कोर्टाला पत्र लिहिलं असून, केंद्रीय तपास यंत्रणेकडून सुरु असलेला तपास आपल्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा आणि गोपनीयतेवर आक्रमण करणारा असल्याचं म्हटलं आहे. 

"मी पीडित आहे. माझ्या वैयक्तिक आणि राजकीय प्रतिमेला टार्गेट करण्यात आलं आहे. माझा मोबाईल फोन सर्व टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आला. हा माझ्या गोपनीयतेवर हल्ला आहे," असं कविता यांनी पत्रात लिहिलं आहे. त्यांच्या वकिलांनी कोर्टात हे पत्र वाचून दाखवलं. पत्रात पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केलं आहे. तसंच बँके खात्याची सर्व माहितीही दिली आहे. ईडीने मी मोबाईल फोन उद्ध्वस्त केल्याचा दावा केला असून, ते सर्व मोबाईल मी त्यांना देणार आहे".