नवी दिल्ली : इराकमध्ये मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांच्या कुटुंबियांनी परषाट्र मंत्री सुषमा स्वराज यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान इराकमध्ये मारल्या गेलेल्या त्या सर्व भारतीयांचे पार्थीव भारतात आणले जाईल, असा विश्वास स्वराज यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिला.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवडाभरात मृतांचे पार्थीव भारतात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे अश्वासनही स्वराज यांनी मृतांच्या कुटुंबियांना दिले. ही पार्थिवं भारतात आणण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्हि के सिंह हे स्वत: इराकला जातील असेही सूत्रांनी म्हटले आहे.
इराकमध्ये मारल्या गेलेल्या मृतांपैकी एक असलेल्या गोबिंदर सिंह यांचे छोटे बंधू दविंदर सिंह यांनी सांगितले की, आम्हाला अश्वासन देण्यात आले आहे की, मृतांच्या परिवारातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या चर्चेत मृतांची पार्थीवं भारतात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे अश्वासन दिल्याचेही दविंदर यांनी सांगितले.