भारतीय जवानांकडून वर्षभरात २४४ दहशतवाद्यांचा खात्मा

२०१८ साली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सर्वाधिक घुसखोरी  करण्यात आली.

Updated: Feb 13, 2019, 01:38 PM IST
भारतीय जवानांकडून वर्षभरात २४४ दहशतवाद्यांचा खात्मा title=

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सर्वाधिक दहशतवादी मारले गेल्याचे गृह मंत्रालयाने दिलेल्या एका अहवालातून सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार, २०१६ मध्ये १३५, २०१७ मध्ये २०७ तर २०१८ मध्ये २४४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. गेल्या वर्षांत २०१८ साली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सर्वाधिक वेळा घुसखोरी करण्यात आल्याचेही अवहालातून समोर आले आहे. 

दहशतवाद्यांनी भारतीय सीनेवर २०१६ साली ११९ वेळा घुसखोरी केली आहे. तर पुढील दोन वर्षांत २०१७ साली १३६ वेळा तर २०१८ मध्ये १४३ वेळा घुसखोरी केली. जवळपास २ हजार किलोमीटर लांब असलेल्या भारतीय सीमेवर ४०० किलोमीटरपर्यंतचे लांब रस्ते, १९२० किलोमीटरपर्यंत फ्लड लाइट आणि जवळपास ६५६ चौकी उभारण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित बनवण्यासाठी सीमा सुरक्षा दल बहुआयामी दृष्टीकोनाचा अवलंब करत आहे. ज्यानुसार सीमेवर चोवीस तास देखरेख ठेवण्यात येईल. जवानांना आधुनिक हत्यारेही पुरवण्यात आली आहेत. 

गेल्या वर्षी भारत-पाक सीमा आणि लाइन ऑफ कंट्रोलवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. २०१८ साली दहशतवाद्यांकडून २,१४० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यात बीएसएफच्या १४ जवानांचा मृत्यू झाला होता तर ५३ जवान जखमी झाले होते. २०१७ मध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करून ९७१ वेळा करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचे चार जवान मारले गेले होते.