CDS जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं क्रॅश झालं? तीन वर्षांनंतर खरं कारण समोर

Bipin Rawat Helicopter Crash Reason: देशाला हादरवणारा अपघात... तीन वर्षांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी...   

सायली पाटील | Updated: Dec 20, 2024, 09:21 AM IST
CDS जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं क्रॅश झालं? तीन वर्षांनंतर खरं कारण समोर  title=
latest update cds general bipin rawat helicopter crash reason parliamentary committee report

Bipin Rawat Helicopter Crash Reason: देशातील पहिले सीडीएस (CDS) जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी संघटित करण्यात आलेल्या एका समितीनं अखेर महत्त्वाचा अहवाल सादर केला असून, या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सदर समितीच्या अहवालामध्ये 8 डिसेंबर 2021 मध्ये एमआय 17 वी5 हेलिकॉप्टर अपघातामागील नेमकं कारण समोर आणलं गेलं. 

समितीच्या निरीक्षण आणि उपलब्ध माहितीच्या आधारे हा अपघात एक मानवी चूक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि लष्करातील इतर काही अधिकारी यावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. तो अपघात इतका भीषण होता की यामध्ये सर्वांचाच मृत्यू ओढावला. तामिनळाडूतील कुन्नूर इथं हा भीषण अपघात झाला होता. 

मंगळवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये संरक्षण संबंधी स्थायी समितीनं 13 व्या रक्षा योजना अवधीदरम्यान झालेल्या वायुदलाच्या विमानांच्या अपघातांची आकडेवारी सादर करण्यात आली. यामध्ये एकूण 34 दुर्घटना समोर आल्या ज्यामध्ये 2021-22 मध्ये भारतीय वायुदलाची एकूण 9 विमानं दुर्घटनाग्रस्त झाली. 2018-19 मध्ये अशा 11 अपघातांची नोंद करण्यात आली होती. 

दरम्यान याच अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार तानिळनाडूच्या कुन्नूर इथं पर्वतरांगांमध्ये जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची नोंद असून, अपघाताच्या तीन वर्षांनंतर त्यासंदर्भातील कारणमीमांसा करणारा एक अहवाल समोर आला आहे. ही घटना Human Error अर्थात मानवी (Aircrew) चुकीमुळं घडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : जगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत 

 

जनरल रावत यांच्या या हेलिकॉप्टर अपघातातून फक्त वैमानिकाचाच जीव वाचला असून, त्यांचं नाव होतं कॅप्टन वरूण सिंह. अपघातातून बचावलेल्या या वैमानिकाचा त्यानंतर उपचारादरम्यान मात्र मृत्यू ओढावला. संपूर्ण देशाला या घटनेमुळं हादरा बसला असून, 2021 या वर्षअखेरीस सारा देश हळहळला होता. अपघातानंतर घटनास्थळाची दृश्य समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीनं बचावकार्य हाती घेतलं. पण, हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की मृतांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढतानाही कैक अडचणी आल्या.