जयपूरमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. हल्लेखोरांनी घरात घुसून सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या केली. चर्चा करण्याच्या निमित्ताने हल्लेखोर सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या जयपूरमधील घऱी आले होते. दरम्यान यावेळी झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये एक हल्लेखोरही ठार झाला आहे. यानंतर पोलिसांकडून हल्लेखोरांना पकडण्यासाठी कारवाई सुरु झाली आहे. यादरम्यान, गँगस्टर रोहित गोदाराने सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. इतकंच नाही तर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हत्या का केली याचा खुलासा केला आहे.
रोहित गोदारा हा लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित आहे. रोहितने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "सर्व बंधूंना राम राम. मी रोहित गोदारा कपूरसरी, गोल्डी बराड बंधूंनो, आज आम्ही सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी घेतो. आम्ही ही हत्या घडवून आणली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो आमच्या शत्रूंना भेटायचा आणि त्यांना पाठिंबा देत असे, ते त्यांना पूर्णपणे बळकट करायचे. आता राहिला प्रश्न आमच्या शत्रूंचा, तर त्यांनी त्यांच्या घराच्या दारात तिरडी तयार ठेवावी.'' नंतर मात्र रोहित गोदाराने सोशल मीडियावर लिहिलेली ही पोस्ट हटवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी श्यामनगर परिसरात चार ते पाच शस्त्रधारी हल्लेखोर सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घरी पोहोचले आणि गोळीबार केला. गोळी लागल्याने गोगामेडी, त्यांचा एक सुरक्षारक्षक आणि अजून एक व्यक्ती जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारचे लोक धावत घटनास्थळी दाखल झाले होते. सुखदेव सिंह गोगामेडी यांना तात्काळ मेट्रोजवळ असणाऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांनी जयपूरमध्ये नाकाबंदी केली होती.
या हत्याकांडावर जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितलं की, हल्लेखोरांची ओळख पटली आहे. क्रॉस फायरिंग केली असता नवीन सिंग शेखावत नावाच्या एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. तो जय़पूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता आणि कपड्यांचे दुकान चालवत होता. उर्वरित दोन हल्लेखोरांनी स्कूटर हिसकावून पळ काढला.
सुरक्षा रक्षकाशी बोलून हल्लेखोर आत गेले होते. गोगामेडी यांच्या सांगण्यावरूनच त्यांना सकाळी आत बोलावण्यात आलं होतं. हल्लेखोर गोगामेडी यांच्याशी बोलत होते, त्यानंतर काही वेळातच त्यांनी सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांचा मृत्यू झाला.