नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान संपलं आहे. ७ राज्यांत ५ पर्यंत ६० टक्के मतदान झालं. तर हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८० टक्के मतदान झालं. सहाव्या टप्प्यात ७ राज्यात ५९ जागांवर मतदान झालं. यात उत्तर प्रदेशमध्ये ५१ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ६० टक्के, झारखंडमध्ये ६४ टक्के, दिल्ली आणि बिहारमध्ये प्रत्येकी ५५ टक्के, हरियाणामध्ये ६२ टक्के मतदानाची नोंद झाली.
पश्चिम बंगालमधील घाटलच्या भाजपा उमेदवार भारती घोष यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफो़ड करण्यात आली. दरम्यान या संपुर्ण घटनेचा निषेध व्यक्त करत या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचे पक्ष कार्यकर्ते असल्याचा आरोप पश्चिम बंगाल भाजपाच्यावतीने करण्यात आला आहे. तर शनिवारी झारग्राममध्ये भाजपाचे बूथ कार्यकर्ता रमण सिंह यांची हत्या झालीये. रमण सिंह गोपीबल्लभपूर येथील भाजपाचे बूथ कार्यकर्ता होते. टीएमसी कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला. हा हल्ला तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप दिलीप घोष यांनी केला आहे. पराभवाच्या भीतीने तृणमूल असं करत असल्याचा आरोपही घोष यांनी केलाय. इथल्या बांकुरामधील मतदान केंद्रावर तृणमूल काँग्रेसने गडबड केल्याचा आरोपही भाजपाने केला आहे.
अनेक दिग्गजांनी सकाळी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला... राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसंच नवी दिल्लीतल्या औरंगजेब लेन इथल्या सीनिअर सेकंडरी स्कूलमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील मतदान केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदान केलं.
भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये मतदानाचा हक्क बजावला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याशी लढत आहे. मतदानाआधी प्रज्ञासिंह यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं. भाजपा उमेदवार डॉ हर्षवर्धन यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. पूर्व दिल्लीतल्या कृष्णा नगरमधल्या रतन देवी आर्य गर्ल्स स्कूलमध्ये मतदान केलं. अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याचं त्यांनी मतदारांना आवाहन केलं. तसंच दिल्लीतल्या सातही जागांवर भाजपाचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनंही सकाळी सकाळी मतदानाचा हक्क बजावलाय. गुरुग्राम इथल्या मतदान केंद्रावर कोहली पोहचला. सकाळच्या वेळी मतदानासाठी गर्दी असल्याने बराच वेळ कोहली रांगेत उभा होता. यावेळी कोहलीच्या चाहत्यांनी त्याच्याशी संवाद साधला. यानंतर कोहलीने आपला मतदानाचा हक्क बजावला.
माजी क्रिकेटर आणि भाजपा उमेदवार गौतम गंभीरनंही मतदान केलंय. दिल्लीतल्या मतदान केंद्रावर गंभीरनं मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी गंभीरसह त्याच्या पत्नीनंही मतदान केलं.