पाटणा: लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या बेगुसराय मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. यावेळी मतदान केंद्रावर घडलेल्या एका प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एका महिलेने आपल्यावर भाजपच्या गिरीराज सिंह यांना मत देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मला कन्हैया कुमारला मत द्यायचे होते. मात्र, केंद्रातील अधिकाऱ्यांनी मला जबरदस्तीने गिरीराज सिंह यांच्या नावासमोरील बटन दाबायला लावले. यंदा बेगुसरायमध्ये केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैया कुमार यांच्यात थेट लढत आहे. संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.
मात्र, बेगुसरायच्या बभनगावा पंचायत क्षेत्रातील मतदान केंद्रावर घडलेल्या या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित महिलेच्या दाव्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनीच तिला गिरीराज सिंह यांना मत देण्यासाठी जबरदस्ती केली. मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर या महिलेने सोशल मीडियावर आपली कैफियत मांडली. या प्रकारानंतर स्थानिक लोक प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करतानाही दिसत आहेत. मात्र, अजूनही या व्हीडिओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.
दरम्यान, कन्हैया कुमार याने आज मतदान केल्यानंतर विजय आपलाच होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. २३ मे रोजी निकाल लोकांसमोर येईलच. लोकांनी यंदा दल (पक्ष) बघून नव्हे तर 'दिल'से मतदान केल्याची प्रतिक्रिया कन्हैयाने व्यक्त केली.
२०१४ मध्ये भाजपच्या भोला सिंह यांना बेगुसरायमधून लढताना ४,२८,२२७ मते पडली होती. त्यांनी राजदचे उमेदवार तन्वीर हसन यांचा ५८३३५ मतांना पराभव केला होता. मात्र, २०१८ मध्ये भोला सिंह यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे भाजपने यंदा बेगुसरायमधून गिरीराज सिंह यांना उमेदवारी दिली आहे.