मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा होणार घोषित - सूत्र

केंद्र सरकारकडे सक्रीय रुपात काम करण्यासाठी आता उरलाय केवळ एक महिना

Updated: Jan 28, 2019, 01:21 PM IST
मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा होणार घोषित - सूत्र

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस प्रमुखांना पत्र लिहून २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व बदल्या संपवण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर कोणत्याही पद्धतीनं बदल्या होणार नाहीत. यासोबतच निवडणूक आयोगानं संबंधित रिपोर्टही सादर करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच केंद्र सरकारकडे सक्रीय रुपात काम करण्यासाठी आता केवळ एक महिना उरलाय. 

तरुण मतदारांना मतदानाचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच प्रसारित झालेल्या 'मन की बात' या कार्यक्रमात देशातील तरुणांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. तरुण मतदारांनी स्वत:ची नोंदणी करुन मतदान करावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाबद्दलही माहिती दिली. निवडणूक आयोग ही आपल्या देशातील महत्त्वाची संस्था आहे. जी आपल्या प्रजासत्ताकपेक्षाही जुनी आहे. २५ जानेवारीला निवडणूक आयोग स्थापना दिवस होता. हा दिवस 'राष्ट्रीय मतदाता' म्हणून ओळखला जातो. उल्लेखनीय म्हणजे, ३० डिसेंबर २०१८ ला झालेल्या 'मन की बात'मध्ये त्यांनी प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले होते.  

२१ व्या शतकात जन्मलेली तरुण मंडळी देशातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होत आहेत. कारण त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. आपली स्वप्न देशाच्या स्वप्नांशी जोडण्यासाठी तरुणांनी मतदान करणं आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं. त्यांच्यासाठी आता देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली असल्याचं म्हणत मोदींनी तरुणांना साद घातली होती.