चाईबासा : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा हिला भाजपकडून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. यानंतर उठलेल्या गदारोळाला उत्तर देण्यासाठी आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. नरेंद्र मोदींनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांना 'देशद्रोही' म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञा हिची पाठराखण केलीय. पंतप्रधान मोदी यांनी झारखंडच्या एका निवडणूक प्रचारसभेत साध्वीची उघडपणे बाजू घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेस आणि सहकारी पक्षांवर भ्रष्टाचार करण्याचा तसंच भ्रष्टाचाऱ्यांना आश्रय देण्याचा आरोपी केला. तसंच प्रज्ञा ठाकूर यांच्याबद्दल प्रश्न विचारणारा मीडिया मधु कोडा आणि लालू प्रसाद यांच्याबद्दल काँग्रेसला का प्रश्न विचारत नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय.
मी विचारतो, आज जो मीडिया येता - जाता प्रज्ञा ठाकूर हिच्याबद्दल सर्व छोट्या-मोठ्या भाजप नेत्यांना दांडकं घेऊन प्रश्न विचारतात, ते काँग्रेसनं जामीन मिळवून दिल्यानंतर खुलेआम फिरणाऱ्या नेत्यांना आणि चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव, कोळसा घोटाळ्यातील आरोपी मधु कोडा यांच्यासारख्या नेत्यांबद्दल का प्रश्न विचारत नाहीत? असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलंय.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर हिला भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोपी नसल्याचं म्हटलंय. काँग्रेसनं चाईबासाच्या सिंहभूम लोकसभा मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांना तिकीट देण्यावरही पंतप्रधानांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.