close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांना ठाकरे-पवारांची गैरहजेरी, काय शिजतंय?

निकालानंतर जर आघाडी करण्याची वेळ आली, तर काय धोरण असावं, याबाबत पवारांची रेड्डींशी चर्चा

Updated: May 21, 2019, 02:08 PM IST
सत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांना ठाकरे-पवारांची गैरहजेरी, काय शिजतंय?

मुंबई : एक्झिट पोल (EXIT POLL) जाहीर झाल्यानंतर दिल्लीतल्या राजकीय हालचालींना वेग आलाय. एकीकडे एनडीएनं 'डिनर डिप्लोमसी'चं आयोजन केलंय तर दुसरीकडे विरोधकांच्या गोटातूनही एक बैठक बोलावण्यात आलीय. परंतु, या दोन्ही महत्त्वाच्या बैठकींना महाराष्ट्रातील दोन मोठे नेते मात्र गैरहजर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून आयोजित करण्यात आलेलं भोजन उद्धव ठाकरे यांनी टाळलंय. तर विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनुपस्थित राहण्याचं सांगितल्यानं अनेक चर्चांना फाटे फुटलेत.

अमित शाहांची 'पुरणपोळी' ठाकरेंनी नाकारली

भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी आज एनडीए नेत्यांची बैठक बोलावलीय. आज रात्री दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतरच्या रणनितीबाबत यावेळी चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. एनडीएच्या घटकपक्षांचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला हजर राहणारयत. पंतप्रधानही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत अनौपचारिक बैठक बोलावलीय. ही बैठक म्हणजे मंत्र्यांना निरोप समारंभ असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, हंसराज अहिर, सुभाष भामरे आणि पियुष गोयल दिल्लीत दाखल झालेत. दुपारी साडेचार वाजता ही बैठक सुरू होणार असल्याची माहिती मिळतेय. पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. 

रात्रीच्या भोजनात उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास महाराष्ट्राची 'पुरणपोळी' बनवण्याचं काम सुरू होतं. परंतु, शिवसेना प्रमुखांनी मात्र अमित शहांची ही 'पुरणपोळी' बाजुला सारलीय. शिवसेनेकडून महाराष्ट्रातील मंत्री सुभाष देसाई अमित शाह यांच्या डिनर पार्टीत सहभागी होणार आहेत.

विरोधकांच्या बैठकीला पवारांची दांडी

विरोधकांची आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र या बैठकीआधीच विरोधकांत फूट पडल्याचं चित्रं आहे. बैठकीला बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव अनुपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच डी कुमारस्वामी अनुपस्थित राहणार आहेत. त्यांच्याऐवजी त्यांचा प्रतिनिधी बैठकीला उपस्थित असेल. कुमारस्वामींनी आजचा दिल्ली दौरा रद्द केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या बैठकीला शरद पवारांच्या ऐवजी प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. एनडीए आणि यूपीएत नसलेले बीजेडी आणि टीआरएस हे देखील या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दिल्लीत राजकीय चर्चांना उधाण आलंय. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी दीड वाजता ही बैठक होणार आहे. २१ विरोधी पक्षांची ही बैठक असणार आहे. या बैठकीनंतर विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसह २३ मे रोजीच्या निकालासह आघाडीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. निकालानंतर जर आघाडी करण्याची वेळ आली, तर काय धोरण असावं, याबाबत पवारांनी रेड्डींशी चर्चा केल्याचं कळतंय. मात्र रेड्डींकडून पवारांना कुठलंही ठोस आश्वासन देण्यात आलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.