... म्हणून 'या' लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरने होणार मतदान

अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटपही करायचे आहे.

Updated: Mar 29, 2019, 02:19 PM IST
... म्हणून 'या' लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरने होणार मतदान title=

हैदराबाद: देशात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोमात सुरु असताना तेलंगणातील निझामाबाद मतदारसंघात एक वेगळाच पेच उद्भवला होता. यामुळे हैदराबादमधली निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली. निझामाबाद मतदारसंघात चार-पाच नव्हे तर १८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता निझामाबादमधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. मात्र, चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर रोष असल्याने १७५ शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात अर्ज भरला आहे. हळदीच्या भावाने दशकातील निच्चांक गाठल्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. 

निझामाबाद मतदारसंघातील परिस्थितीबद्दल माहिती देताना मुख्य निवडणूक अधिकारी रजत कुमार यांनी सांगितले की, चार मतदान यंत्रे एकत्र जोडली तरी एकावेळी फक्त ६४ उमेदवारांसाठी मतदान घेता येऊ शकते. मात्र, निझामाबादमध्ये १८५ उमेदवारी उभे असल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर आम्ही याठिकाणी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्याचे रजत कुमार यांनी सांगितले. 

त्यासाठी येत्या १० दिवसांमध्ये १५ लाख मोठ्या आकाराच्या मतपत्रिका छापण्यात येतील. तसेच या मतपत्रिका ठेवण्यासाठी मतपेट्याही मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटपही करायचे आहे. या सगळ्यासाठी बराचवेळ जाईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले. 

१९९६ नंतर तेलंगणात पहिल्यांदाच बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेतले जात आहे. त्यावेळी तेलंगणा राष्ट्र समिती, काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांसह २४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

दरम्यान, सध्या तेलंगणा राष्ट्र समितीकडून शेतकऱ्यांनी उमेदवारी मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले होते. हळदीला योग्य भाव मिळवून देऊ, असे आश्वासनही त्यांना देण्यात आले. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला.