LokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर

LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं.   

शिवराज यादव | Updated: Mar 16, 2024, 06:47 PM IST
LokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर title=

LokSabha: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला, 26 एप्रिलला दुसरा टप्पा तर शेवटचा टप्पा 1 जूनला असणार आहे. तर मतमोजणी 4 जूनला होईल. दरम्यान या पत्रकार परिषदेत आयुक्त राजीव कुमार यांनी आपला शायराना अंदाज मांडला. 

राजीव कुमार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना शायरीची मदत घेतली. त्यांनी राजकीय पक्षांना एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करु नका असा सल्ला दिला. दरम्यान हे सांगताना त्यांनी शायर बशीर बद्र यांचा शेऱ ऐकवला. 

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों

राजीव कुमार यांनी यावेळी आजकाल मित्र आणि शत्रू बनवण्याची प्रक्रिया फार वेगाने सुरु असल्याचं म्हटलं. राजकीय नेत्यांनी इतकंही वाईट बोलू नये की ते एकमेकांचे शत्रू होतील आणि पुढे काही करता येणार नाही असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी डिजिटल माध्यमावर बोलतानाही सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. 

"डिजिटल माध्यमावर आपल्या तोंडून जे काही निघतं ते तिथे कायमचं रेकॉर्ड होतं आणि सतत सुरु राहतं. त्यामुळे कृपया घाणेरड्या शब्दांचा वापर करत वाईट डिजिटल आठवणी तयार करु नका. यामुळे वारंवार भांडणं होतात आणि प्रेमाचे धागे तुटतात. जेव्हा हे धागे तुटतात तेव्हा फार अडचण होते," असं राजीव कुमार यांनी सांगितलं. यानंतर त्यांनी रहीम यांचा शेर ऐकवला. 

रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो छिटकाय,
टूटे से फिर न मिले, मिले गाँठ परिजाय. 

राजीव कुमार यांनी राजकीय पक्षांना प्रेमाने प्रचार करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच यावेळी त्यांनी ईव्हीएमवरुन होणारी टीका आणि आरोपांनाही उत्तर दिलं. यासाठीही त्यांनी शायरीचाच आधार घेतला. 

अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं, 
वफा खुद से नहीं होती खता ईवीएम की कहते हो.

हा शेर आपण स्वत: लिहिला असल्याची माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली. 

निवडणूक कधी?

देशात लोकसभेच्या 543 जागांच्या निवडणुकीसाठी 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल , 7 मे, 13 मे , 20 मे, 25 मे व 1 जून यादिवशी मतदान पार पडेल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल , 26 एप्रिल तसंच 7, 13 आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण देशातील सर्व जागांवरचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे.