नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड प्रमाणात वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांसाठी मोठे पक्ष आता उमेदवारांची यादी जाहीर करण्याला प्राधान्य देत असून, भाजपाच्या उमेदवार यादीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील जागेसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं तिकीट कापण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी अमित शाह यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजपाच्या बैठकीतही याविषयीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपाच्या प्रदेश कमिटीकडून अडवाणींच्या उमेदवारीविषयी हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पक्षनिरीक्षकांकडे अडवाणींऐवजी शाह यांना गांधीनगरचं तिकीट देण्यात यावं असा आग्रह करण्यात आला आहे.
अडवाणी यांचा गेल्या काही दिवसांमधील राजकीय वावर पाहता ते आता राजकारणातून निवृत्ती घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणारे अडवाणी संसदेतही फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी केल्याचं कळत आहे. वयाच्या चौदाव्या वर्षापासून आरएसएस आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आता भाजपच्या मार्गदर्शक पदी पोहोचलेल्या अडवाणींची राजकीय कारकिर्द फार लक्षवेधी आहे. एका अर्थी भाजपामधील एक महत्त्वाचं नाव असल्यासोबतच ते भाजपचा कणा असल्याचंही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर पक्ष काय निर्णय घेणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, गांधीनगरमधून सहा वेळा खासदार पदी निवडून आलेल्या अडवाणी यांच्या उमेदवारीविषयी मांडण्यात आलेल्या या प्रस्तावावर भाजपाची संसदीय समिती अंतिम निर्णय घेणार आहे. सध्या या मुद्द्यावर खुद्द अडवाणींकडूनही कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. पण, राजकीय वर्तुळातील ही एक मोठी घडामोड असून, अडवाणींच्या राजकीय कारकिर्दीचा हा समारोप तर नाही? असा प्रश्न अडवाणी समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.