एकेकाळी मोदींसाठी जागा सोडणाऱ्या जोशींचा पत्ता कापला, मतदारांना भावूक पत्र

'राष्ट्रीय संघटना मंत्री रामलाल यांनी कानपूरमधूनच नाही तर कुठूनही लढू नये, असा संदेश दिलाय'

Updated: Mar 26, 2019, 12:08 PM IST
एकेकाळी मोदींसाठी जागा सोडणाऱ्या जोशींचा पत्ता कापला, मतदारांना भावूक पत्र  title=

कानपूर : लालकृष्ण अडवाणींपाठोपाठ ८५ वर्षीय मुरली मनोहर जोशींचाही भाजपानं पत्ता कापलाय. भाजपाचे राष्ट्रीय संघटन मंत्री रामलाल यांनी मुरली मनोहर जोशींना यासंदर्भात निरोप दिलाय. कानपूर किंवा इतर कुठूनही निवडणूक लढू नका, असा संदेश जोशींना पक्षानं लेखी पत्रद्वारे संदेश दिलाय. या संदर्भात दिल्लीतील मुख्यालयातून रामलाल यांच्या सहीचं पत्र दिलं गेलंय. पक्षानं धाडलेलं पत्र मुरली मनोहर जोशींकडून सार्वजनिक करण्यात आलंय. 

यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी कानपूरच्या मतदारांना उद्देशून एक पत्र लिहिलंय. या पत्रात पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेत्यांना उमेदवारी डावलल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या नेत्यानं उघडपणे आपली नाराजी जाहीर केलीय. 

'प्रिय कानपूरच्या मतदारांनो, यंदा माझं नाव भाजपच्या उमेदवारांच्या यादीत नाही. राष्ट्रीय संघटना मंत्री रामलाल यांनी कानपूरमधूनच नाही तर कुठूनही लढू नये, असा संदेश दिलाय' असं त्यांनी या जाहीर पत्रात म्हटलंय. या पत्रावर मुरली मनोहर जोशी असा नाव असलं तरी त्यांची सही मात्र नाही. 

२००९ साली जोशी यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. परंतु, २०१४ साली त्यांनी ही जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी रिकामी केली होती. यानंतर मुरली मनोहर जोशी यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकीत कानपूरमधून भाजपचा झेंडा फडकावला. जोशी यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तब्बल २.२२ लाख मतांच्या अंतरानं पछाडलं होतं.