Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : गांधी कुटुंब काँग्रेसला मतदान करण्यास असमर्थ का? सहाव्या टप्प्यातील निवडणुकीतून मोठी बातमी... काय आहे यामागचं नेमकं कारण?  

सायली पाटील | Updated: May 25, 2024, 08:15 AM IST
Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?  title=
Loksabha election 2024 sixth phase for the first time rahul sonia and Gandhi family will vote for other than congress party

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या निवडणूक आणि तत्सम घडामोडींचा वेग काहीसा मंदावला असला, तरीही देशात मात्र अद्याप निवडणुकीचा माहोल कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचं मतदान शनिवार, 25 मे 2024 रोजी पार पडत असून, यामध्ये 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 58 जागांसाठी मतदान पार पडत आहेय. 

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघाचा या टप्प्यामधघ्ये समावेश असून, या सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे 3 केंद्रीय मंत्री रिंगणात आहेत. तर तीन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, मनोहर लाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यासोबतच मनोज तिवारी, कन्हैय्या कुमार, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ हे उमेदवारही रिंगणात आहेत.

गांधी कुटुंब काँग्रेसला नाही देऊ शकणार मत.... 

लोकसभा निवडणुकीच्या या सहाव्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात गांधी कुटुंबासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंब काँग्रेस पक्षासाठी मतदान करता येणार नाहीय. थोडक्यात यंदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबाला काँग्रेसच्या पंजाला मतदान करता येणार नाही. यंदा गांधी कुटुंब आम आदमी पक्षाच्या (AAP) झाडू या चिन्हासाठी मतदान करणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात? 

गांधी कुटुंबाचं मत 'आप'ला...असं का? 

दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी झाली आहे.  त्यात नवी दिल्लीचा लोकसभा मतदारसंघ हा आम आदमी पक्षाला मिळाला असून, याच नवी दिल्ली मतदारसंघात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचंही मतदान आहे. नवी दिल्लीतील या लोकसभा मतदारसंघात आपकडून सोमनाथ भारती हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात दिवंगत सुषमा स्वराज्या यांची मुलगी बांसुरी स्वराज भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळं या मतदारसंघाची लढत देशाच्या राजकीय पटलावर सर्वांचं लक्ष वेधताना दिसत आहे.