Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?

Maharashtra Weather News : हवामान बदलांचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून, सध्याच्या घडीला राज्यावर अवकाळीसोबतच उष्णतेच्या लाटेचं संकटही पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: May 25, 2024, 07:12 AM IST
Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?  title=
Maharashtra Weather News heat wave in vidarbha cyclone remal latest updates

Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) केरळातील आणि त्यानंतर महाराष्ट्रातील आगमनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच देशावर घोंगावणाऱ्या रेमल (Cyclone Remal) या चक्रिवादळानं संपूर्ण चित्र पालटल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात समाधानकारक वेगानं प्रवास करणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मागील दोन दिवसांमध्ये मंदावला आणि त्यानंतर पुन्हा या वाऱ्याचा प्रवास अंदमानच्या उर्वरित भागासह श्रीलंकेपर्यंत सुरु झाला. इथं मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झालेली असतानाच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमन या चक्रीवादळानं संपूर्ण परिस्थिती बदलल्याचं पाहायला मिळालं. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये हे चक्रीवादळ  बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार असून, त्यामुळं पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारपर्यंत या चक्रिवादळामुळं परिस्थिती आणखी बदललेली दिसेल. इथं महाराष्ट्रावर या वादळामुळं थेट परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. उलटपक्षी राजच्याच्या विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळीचाही इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबईला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाने दिले स्पष्टीकरण

 

मराठवाडा, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी असेल, तर, इथं वादळी वारे अडचणी वाढवताना दिसतील. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मात्र आकाश निरभ्र राहिल, तर क्वचितप्रसंगी शहराच्या काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. 

मान्सून कुठपर्यंत पोहोचला? 

सध्याच्या घडीला मान्सूनचे  वारे अंदमानच्या समुद्रावर असून, तिथं त्यांचा वेग काहीसा मंदावला असला तरीही येत्या काळात हे वारे पुन्हा वेगानं वाहून केरळच्या वेशीवर धडकण्याचा अंदाज आहे. सध्या केरळातील मान्सूनच्या आगमनाची अपेक्षित तारीख 31 मे असून, त्यानंतर हा मान्सून मुंबईत 10 ते 11 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आयएमडीच्या वृत्तानुसार ही निश्चित तारीख नसून, मान्सूनच्या आगमनास तीन ते चार दिवसांचा विलंबही नाकारता येत नाही.