close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही 'या' उमेदवाराला मिळाली ३७ हजार मतं

मतदानाच्या काही दिवस आधीच.... 

Updated: May 27, 2019, 12:16 PM IST
लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही 'या' उमेदवाराला मिळाली ३७ हजार मतं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देशभरात भाजपाची लाट असल्याचं स्पष्ट झालं. काही मतदार संघ वगळता देशात असणारी भाजापाची ही हवा अनेक बाबतीच सूचक अशीच ठरली. याचदरम्यान आता मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघातील एका बातमीने साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे. लक्ष वेधण्याचं कारण ठरत आहे ते म्हणजे निवडणुकीतून माघार घेतलेला एक उमेदवार. 

मतदानाच्या काही दिवस आधीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं. बसपाच्या गुणा या मतदारसंघातील त्या उमेदवाराचं नाव, लोकेंद्र सिंह धाकड. ज्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रती असणाऱ्या एकनिष्ठेपायी मतदान प्रक्रिया पार पडण्यास काही दिवस शिल्लक असतानाच धाकड यांनी काँग्रेसचा हात धरला. २९ एप्रिल, म्हणजेच सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली असतानाच धाकड यांनी शिंदे यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कामामुळे प्रभावित झाल्याचं म्हणत त्यांनी शिंदेंसाठीत मतदारांनी मतं द्यावीत असं आवाहन केलं. 

'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या सगळ्या प्रकारानंतर बसपा प्रमुख मायावती यांचा राग अनावर झाला. परिणामी त्यांनी मध्य प्रदेश सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचीही धमकी दिली होती. निवडणूक यंत्रणेचा वापर करून बसपाच्या उमेदवाराला जबरदस्तीने उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं, असा आरोपही मायवाती यांनी केला होता. मात्र, धाकड यांनी अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेतल्यामुळे मायावतींना नवा उमेदवार उभा करण्यासही अवधी मिळाला नाही. परिणामी त्यांनी उमेदवाराशिवाय फक्त बसपाच्या चिन्हालाच मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं.

धाकड हे बसपाचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे ईव्हीएम यंत्रात पक्षाच्या चिन्हापुढे त्यांचं नावही होतं. अखेर ज्यावेळी मतमोजणीमध्ये धाकड यांना मिळालेल्या मतांच्या आकड्याने अनेकजण थक्क झाले. त्यांना ३७ हजार ५३० मतं मिळाली होती. मुख्य म्हणजे या मतदारसंघात शिंदे यांचा पराभव झाला होता. भाजपाच्या कृष्णपाल सिंह यांच्याकडून १,२५, ५४९ मतांच्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

शिंदे यांच्या पराभवानंतर धाकड यांना मिळालेल्या मतांविषयी खुद्द त्यांनीच प्रतिक्या दिली. मतदार संघातील अनेक मतदार हे दूरगामी भागांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना मी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहितीही नसावी असं म्हणत मी शिंदेंना पाठिंबा दिला असला तरीही मतदारांनी मात्र बसलाला साथ दिली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मित्र पक्षांवर नाराजी असणाऱ्या आणि धाकड समुदायातील काही मतदारांची मतं आपल्याला मिळाली असण्याचा धाकड यांचा अंदाज आहे. इकतच नव्हे तर, बसपाकडून आपल्या उमेदवारीविषयी पुनर्विचार केला जावा असा सल्ला देण्यात आल्याचा खुलासाही त्यांनी केला होता. धाकड यांनी निवडणूक न लढताही त्यांच्या वाट्याला आलेली ही मतं पाहता लोकशाहीच्या उत्सवातील ही वेगळीच घटना सध्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.