काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमचा पराभव झाला- प्रकाश आंबेडकर

अनेक ठिकाणी आमचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचले होते.

Updated: May 27, 2019, 11:40 AM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमचा पराभव झाला- प्रकाश आंबेडकर title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पडले होते. त्यामुळे काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, या आरोपांना प्रत्युत्तर देताना उलट काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमचा पराभव झाला, असा प्रतिदावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी म्हटले की, विदर्श, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वंचितच्या उमेदवारांना घसघशीत मते मिळाली आहेत. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचले होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची मते खाल्ल्याने आमचे उमेदवार पराभूत झाल्याचे आंबेडकर यांनी म्हटले.

आघाडीच्या अर्ध्या डझनापेक्षा जास्त जागा पाडून प्रकाश आंबेडकरांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. यामध्ये अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी, माणिकराव ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे. परिणामी आता काँग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजपा आणि शिवसेनेला त्यांची दखल घ्यावीच लागणार आहे.

वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित फसले; दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी ट्विट करून वंचित आघाडीशी आता सर्वांनीच समान पातळीवर चर्चा करावी, असे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवासोबत राजकीय गुलामी ही संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवरच झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते.