सपा-बसपामध्ये जागावाटप, उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढवणार?

उत्तर प्रदेशात सपा-बसपाने जागावाटपाची घोषणा केली.  

सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2019, 10:33 PM IST
सपा-बसपामध्ये जागावाटप, उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढवणार? title=
Pic Courtesy : ANI

लखनऊ : उत्तर प्रदेशात सपा-बसपाने जागावाटपाची घोषणा केली. बसपा ३८ जागा लढवणार असून सपा ३७ जागा लढवणार आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या जागांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता काँग्रेससोबत महाआघाडी होण्याची सूतराम शक्यता नाही. मात्र, सोनिया आणि राहुल गांधी यांच्या रायबरेली आणि अमेठीतून सपा-बसपा उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर तीन जागा राष्ट्रीय लोक दलचे अजित सिंग यांना सोडण्यात आल्या असल्याचे समज आहे. तर दुसरीकडे सपाने बसपापेक्षा एक जागा कमी घेतल्यामुळे सपाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. तर काँग्रेसचे कौतुक केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल २५ वर्षानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी आणि मायावती यांच्या बसपा या पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. आघाडीनंतर दोन्ही पक्ष समान जागांवर लढणार हे स्पष्ट होते. उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी काँग्रसच्या दोन आणि राष्ट्रीय लोकदलाच्या तीन जागा वगळता सर्व जागांवर समान लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. काँग्रेसला आघाडीत घेतले नसले तरी काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर सपा आणि बसपा आघाडीने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राष्ट्रीय लोकदलाला मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगर या जागा सोडण्यात आल्या आहेत. 

जागावाटपानुसार उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागात सर्वाधिक जागा सपा आणि पूर्व भागात सर्वाधिक जागा बसपा लढविणार आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपला जोरदार टक्कर मिळणार आहे. आधीच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना धूळ चारली होती. मात्र, यावेळी उत्तर प्रदेशातील सपा-बसपा हे विरोधक एकत्र येत निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.