LokSabha Election Exit Poll: संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. दरम्यान निकालाआधी घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना 361 ते 401 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलमधील अंदाजानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत ऐतिहासिक विजयाची नोंद करणार आहेत. यानंतर जगभरातील मीडियाने याची दखल घेतली आहे. रशिया, ब्रिटन, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, अमेरिकेसह अनेक देशांनी एक्झिट पोलचं कव्हरेज केलं आहे.
ब्रिटनमधील वृत्तपत्र 'द गार्डियन'ने सोमवारी आपल्या रिपोर्टमध्ये मतदान संपलं असून आता एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी इतिहास रचत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं सांगितलं आहे. द गार्डियनने रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक, एप्रिल महिन्यात सुरु झाली होती. भारतात भयानक उकाडा असून यादरम्यान एक डझन लोक आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
'शनिवारी रात्री आलेल्या एक्झिट पोलच्या निकालात मोदी आणि भाजपा एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. बहुमतासाठी गरज असणारा आकडा ते ओलांडताना दिसत आहेत. हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदींसाठी हा ऐतिहासिक विजय असेल. ज्यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर कोणतेही पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा जिंकलेले नाहीत'.
चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लिहिलं आहे की, एक्झिट पोलच्या निकालांवरुन नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा जिंकणार असल्याचं समजत आहेत. तज्ज्ञांच्य हवाल्याने वृत्तपत्रात सांगण्यात आलं आहे की, नरेंद्र मोदी विजयानंतर राजकारण आणि विदेशी धोरणात काही बदल करणार नाहीत. पण भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
ग्लोबल टाइम्सने तज्ज्ञांच्या हवाल्याने लिहिलं आहे की, 'निवडणूक जिंकल्यानंतर मोदींचं लक्ष भारत, अमेरिका आणि चीननंतर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कऱण्यावर असेल. मोदी डिप्लोमॅटिक पद्धतीने जगात भारताचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत'.
रशियामधील सरकारी वृत्तवाहिनी रशिया टीव्हीने एक्झिट पोलवर रिपोर्ट सादर केला आहे. नरेंद्र मोदीचा हा विजय ऐतिहासिक असेल असं त्यांनी म्हटलं आहे. याचं कारण पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर कोणतेही पंतप्रधान सलग तिसऱ्यांदा जिंकलेले नाहीत. नेहरु जवळपास 17 वर्षं सत्तेत होते.
पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र 'डॉन'ने लिहिलं आहे की, एक्झिट पोलचा निष्कर्ष काढायचा झाल्यास बहुमताला 272 जागांची गरज असताना एनडीएला 543 पैकी 350 जागा मिळत आहेत. पुढे लिहिण्यात आलं आहे की, "काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी इंडियाला 120 जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगत आहेत. भारतात एक्झिट पोलचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. निवडणुकीचे निकाल त्यांना चुकीचं ठरवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, भारतासारख्या मोठ्या देशात एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज लावणं मोठं आव्हान आहे".