महिन्याअखेर घरगुती गॅस सिलिंडर तिसऱ्यांदा महागला, जाणून घ्या दर

फेब्रुवारीत घरगुती गॅस सिलेंडर किती महागला आणि काय आहेत दर वाचा सविस्तर

Updated: Feb 26, 2021, 09:45 AM IST
महिन्याअखेर घरगुती गॅस सिलिंडर तिसऱ्यांदा महागला, जाणून घ्या दर title=

मुंबई: पेट्रोलपाठोपाठ आणखीन एक दणका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल 3 वेळा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट तर कोलमडलच पण सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

एकीकडे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर झपाट्यानं वाढत असल्यानं महागाईनं कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आजपासून घरगुती गॅस सिलेंडर आणखी 25 रूपयांनी महाग झाला आहे.

महिन्याभरात तिसऱ्यांदा ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे गॅसच्या किंमतीत एकत्रित 100 रूपयांनी वाढ झाली  आहे. नैसर्गिक वायूच्या आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये वाढ होत असताना या महिन्यात पाठोपाठ झालेली ही तिसरी दरवाढ आहे. 

घरगुती गॅसच्या किमती फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा 4 तारखेला २५ रुपयांनी, तर 15 तारखेला 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता किंमतीत आणखी वाढ झाल्याने एकाच महिन्यात घरगुती सिलिंडर गॅसची किंमत 100 रुपयांनी वाढली आहे.

दुसरीकडे मुंबईत पेट्रोलचे दर 97.34 रुपयांवर आले आहेत. येत्या दिवसात जर दरवाढ कायम राहिली तर शंभरी गाठेल अशी भीती आहे. पेट्रोल, वाढणारा सिलिंडर गॅस आणि महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत.